साताऱ्याचे विनय गाैडा चंद्रपूरचे जिल्हाधिकारी तर ज्ञानेश्वर खिलारी नवे सीईओ

Satara CEO
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांची राज्य शासनाने चंद्रपूरच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती केली आहे. तर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी पुणे येथील सहनोंदणी महानिरीक्षक डी. एस. खिलारी यांची नियुक्ती झाली आहे.

विनय गौडा 2015 च्या आयएएस बॅचचे अधिकारी असून त्यांनी आपल्या सेवेची सुरुवात नंदूरबार येथे सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून केली. गौडा यांची सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर 24 सप्टेंबर 2020 ला नियुक्ती झाली होती. गौडा यांनी विविध विभागांशी समन्वय ठेवत करोना संकटाचा मोठ्या निकराने सामना केला. पदाधिकारी, सदस्य, अधिकारी यांच्याशी समन्वय ठेवत गौडा यांनी जिल्हा परिषदेच्या इतिहासाला साजेसे असे काम केले. जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका लांबल्याने 21 मार्चपासून गौडा यांच्याकडे जिल्हा परिषदेच्या प्रशासकपदाची सुत्रे आली.

ही जबाबदारीही त्यांनी यशस्वी करत विविध विकासकामे, योजना मार्गी लावल्या. गौडा यांच्या कार्यकाळात जिल्हा परिषदेला देश आणि राज्य पातळीवरील पुरस्कारही मिळाले. चंद्रपूर जिल्हाधिकारी पदभार स्वीकारण्याबाबतचे आदेश अप्पर मुख्य सचिव (सेवा) नितीन गद्रे यांनी काढले आहेत. दरम्यान, सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर पुणे येथील सह नोंदणी महानिरीक्षक डी. एस. खिलारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.