कोल्हापूर प्रतीनिधी । सतेज औंधकर
माणगाव येथील स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्या निमित्त सर्व यंत्रणांनी त्यांच्यावर सोपविलेल्या जबाबदाऱ्या काटेकोरपणे पार पाडव्यात असे निर्देश पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज येथे दिले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या माणगाव येथील परिषदेला 100 वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्तानं सामाजिक न्याय विभागामार्फत बांधण्यात आलेल्या स्मारकाचा लोकार्पण सोहळा 21 व 22 मार्च रोजी होणार आहे. या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी शासकीय विश्रामगृहात आयोजित केलेल्या बैठकीत पालकमंत्री बोलत होते. बैठकीस खासदार धैर्यशील माने,जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील, आमदार राजू आवळे, माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर, समाज कल्याण सभापती स्वाती सासणे, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे आदी उपस्थित होते.
माणगाव येथील स्मारकाचा लोकार्पण सोहळा सर्वांच्या सहकार्याने भव्य दिव्य साजरा करुया, असे आवाहन करुन पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, या सोहळ्यासाठी शासनस्तरावरुन आवश्यक त्या उपाययोजना व मदत केली जाईल. हा सोहळा मोठ्या उत्साह व आनंदात साजरा करण्यासाठी नागरिकांबरोबरच सर्व शासकीय यंत्रणांनी सक्रिय सहभाग घेणे गरजेचे राहील. या सोहळ्या निमित्त सर्व शासकीय अधिकाऱ्यांनी परस्पर समन्वय ठेवून नेमून दिलेल्या जबाबदाऱ्या काळजीपूर्वक पूर्ण करण्याची खबरदारी सर्व अधिकाऱ्यांनी घेणे गरजेचे आहे. यामध्ये कसलीही कसूर होता कामा नये, अशी सूचनाही त्यांनी केली.
माणगाव येथे होणाऱ्या लोकोत्सवाच्या निमित्ताने परिसरातील रस्त्यांचे नियोजन शासन व जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने समन्वयाने करावे. कार्यक्रमाच्या ठिकाणी स्वच्छता, सपाटीकरण आदी उद्यापासूनच सुरुवात करावी, असे निर्देश देवून पालकमंत्री श्री पाटील म्हणाले, कार्यक्रमाच्या ठिकाणी आरोग्य, मंडप,स्टेज, बैठक व्यवस्था, विद्युत व्यवस्था, पिण्याचे पाणी, फिरती शौचालये, बॅरेकेट्स, पोलीस बंदोबस्त, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय तपासणी पथकेही तैनात ठेवावित यासाठीच्या नियोजनाचा कृती आराखडा तात्काळ तयार करुन त्यानुसार कार्यवाही करावी, अशी सूचना त्यांनी यावेळी केली.
यावेळी प्रांताधिकारी डॉ. विकास खरात, तहसिलदार प्रदीप उबाळे, समाज कल्याणचे सहायक आयुक्त बाळासाहेब कामत, जिल्हा नियोजन अधिकारी सरीता यादव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता संभाजी माने, कार्यकारी अभियंता संजय सोनवणे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजय माने, कृषी विकास अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव, समाज कल्याण अधिकारी दिपक घाटे, सरपंच ज्योती कांबळे, वैद्यकीय अधिकारी फारुक देसाई यांच्यासह सर्व संबंधित विभागप्रमुख, उप सरपंच राजगोंडा पाटील, वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक संजय पवार, वास्तू रचनाकार अमरजा निंबाळकर आदीसह पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते.
दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.