सातेवाडीची कमाल ः कोरोनाबाधितांसाठी सरपंचाच्या पुढाकारातून गावाने उभारले आयसोलेशन सेंटर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

खटाव तालुक्‍यात कोरोनाबाधितांची संख्या वाढल्याने प्रशासन यंत्रणेवर ताण अशा परिस्थितीवर मात करण्यासाठी खटाव तालुक्यातील सातेवाडी येथील ग्रामस्थांनी गावात आयसोलेशन सेंटर उभारले आहे. सरपंच वृषाली रोमन यांच्या पुढाकारातून साकारलेल्या या सेंटरला ग्रामस्थांचीही मोठी साथ लाभली आहे.

गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग वाढू लागला आहे. ऑक्‍सिजनसाठी ठिकठिकाणी धावाधाव करूनही येथील एका रुग्णाला ऑक्‍सिजनअभावी जिवाला मुकावे लागले. ही बाब ग्रामस्थांना खटकली. त्यामुळे रुग्णांना वेळेत ऑक्‍सिजन मिळावा, अशी ग्रामस्थांत चर्चा झाली. सरपंच वृषाली व त्यांचे पती विक्रम रोमन यांनी त्यासाठी पुढाकार घेतला.

ग्रामस्थांनीही पाठबळ दिले. त्यानुसार ग्रामस्थांनी आयसोलेशन सेंटरसाठी कॉट, गाद्या, बेडशिट, उश्‍या, सॅनिटायझर, मास्क आदी साहित्य लोकसहभागातून आणले. जिल्हा परिषद शाळेत आयसोलेशन सेंटर सुरू करण्यात आले. याठिकाणी पाच ऑक्‍सिजन बेड व दहा आयसोलेशन बेड उपलब्ध आहेत.

या आयसोलेशन सेंटरचे लोकार्पणप्रसंगी परिविक्षाधीन प्रांताधिकारी जनार्दन कासार, तहसीलदार किरण जमदाडे, गटविकास अधिकारी रमेश काळे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. युनूस शेख, वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष मोरे, उपसरपंच भाऊसाहेब बोटे, पोलिस पाटील विजया माने, तलाठी सुनील सत्रे उपस्थित होते. या वेळी श्री. कासार यांनी ग्रामस्थांच्या उपक्रमाचे कौतुक करताना इतरांनाही आदर्श घेण्याचे आवाहन केले. सरपंच वृषाली रोमन यांचेही भाषण झाले.

मेलबर्नमधूनही मदत अन्‌ जवानाचे श्रमदान

गावातील मयूर बोटे हे मेलबर्नला आहेत. गावात आयसोलेशन सेंटरसाठी त्यांनी भरीव सहकार्य केले. जवान रोहित रोमन सुटीनिमित्त गावी आहेत. त्यांनीही जिल्हा परिषद शाळेच्या साफसफाई व स्वच्छतेसाठी श्रमदान केले. गावातील युवकांनीही या श्रमदान मोहिमेत सहभाग नोंदविला.

Leave a Comment