सातारा | सातारा शहरालगचे एक मोठे उपनगर असलेल्या शाहूपुरीचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सुटावा यासाठी आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या अथक प्रयत्नांतून पूर्णत्वास गेलेल्या कण्हेर पाणी पुरवठा योजनेचे पाणी आज शाहूपुरीवासियांच्या घराघरात पोहोचले. शाहूपुरीतील प्रत्येक नागरिकांच्या घरात पाणी पोहचवण्याचे आपले स्वप्न सत्यात उतरले असून त्यामुळे शाहूपुरीतील प्रत्येक नागरिकांची स्वप्नपूर्ती आज झाली, याचे आपल्याला मनस्वी समाधान आहे, अशी प्रतिक्रिया आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी यानिमित्ताने दिली आहे.
शाहूपुरीच्या वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात असणारी पाण्याची वाढती मागणी लक्षात घेऊन आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी कण्हेर पाणी पुरवठा योजनेचा 31 कोटींहून अधिक रकमेचा प्रस्ताव राज्यशासनाकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा करून मंजूर करून घेतला होता. मध्यंतरीच्या काळात या योजनेचे काम अनेक कारणांनी रेंगाळले होते. परंतु, अलिकडच्या काळात पुन्हा एकदा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या बैठकीत या योजनेच्या कामाचा आढावा घेत असताना ही योजना पूर्णत्वास नेण्याठी वाढीव निधी तसेच वनखात्याच्या परवानगी हे मुख्य अडथळे असल्याचे चर्चेअंती निष्पन्न झाले. त्यावेळी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी त्याच बैठकीत वनखात्याच्या संबंधित अधिकाऱ्यांशी त्वरीत संपर्क साधून त्यांना या लोकहिताचे कामी सहकार्य करण्याच्या सूचना दिल्या. तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री ना.अजितदादा पवार यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा करून या योजनेसाठी अतिरिक्त निधी स्वरुपात 12 कोटींचा निधी मंजूर करून घेतला व या सर्वांचे फलस्वरुप म्हणूनच शाहूपुरीवासियांच्या दृष्टीने आज हा सोन्याचा दिवस उजाडला असून या योजनेचे पाणी घराघरात पोहोचले आहे.
शाहूपुरीत समाविष्ट प्रत्येक कॉलनी, नगर आणि सर्व परिसरातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. पाणीप्रश्न सोडवण्यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी सातत्याने अभ्यासपूर्ण पाठपुरावा करून कण्हेर पाणीपुरवठा योजना पूर्णत्वास नेली. आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या हस्ते 31 डिसेंबर 2021 रोजी या योजनेचा जलपूजन सोहळा करून लोकार्पण सोहळा संपन्न झाला होता. सद्यस्थितीत कनेक्शन शिफ्टींगचे काम पूर्णत्वास जाईपर्यंत नवीन कण्हेर योजनेचे पाणी आहे, त्या कनेक्शन मधूनच नागरिकांना पाणी मिळाले आहे. तसेच,रांगोळे कॉलनी व सुर्यवंशी कॉलनी- दौलतनगर येथील बांधलेल्या नवीन योजनेतील पाण्याच्या टाक्यापर्यंत पाणी पोहचण्यासाठीची चाचणी घेण्यात आली असून काही ठिकाणी असलेले किरकोळ लिकेजेस काढल्यानंतर कनेक्शन शिफ्टिंग पूर्णत्वानंतर या दोन्ही टाक्यांवर आधारित असलेल्या नागरिकांनाही लवकरच या कण्हेर योजनेचे पाणी मिळणार आहे.