कराड प्रतिनिधी| विशाल वामनराव पाटील
नाशिक पदवीधर मतदार संघात अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांनी विजय मिळवला आहे. युवक काॅंग्रेसच्या माजी अध्यक्षाला काॅंग्रेसने तिकिट नाकारल्याने ही निवडणूक राज्यात लक्षवेधी ठरली. तर भाजपानेही सत्यजित तांबेंना पाठिंबा दिला होता. अशावेळी राज्यातील काॅंग्रेसच्या युवकांनी सत्यजित तांबेंना आपला पाठिंबा दिला असल्याचे दिसत आहे. कराड शहरात सत्यजित तांबे यांच्या विजयाचे बॅंनर मोठ्या प्रमाणावर झळकू लागले आहेत.
कराड शहरातील चाैका- चाैकात सत्यजित तांबे मित्र परिवाराकडून अभिनंदन फलक झळकले आहेत. तर ढेबेवाडी फाटा येथे चचेगाव येथील काॅंग्रेसचे अभिजीत पाटील व राहूलराज पवार मित्र परिवार, कराड दक्षिण यांनी अभिनंदन फलक लावले आहेत. त्यामुळे सत्यजित तांबे यांच्या विजयामुळे राज्यातील युवक काॅंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्यात आनंदाचे वातावरण दिसून येत आहे.
सत्यजित तांबे एक अभ्यासू व्यक्तिमत्व : अभिजीत पाटील
सर्व सामान्य कुटुंबातील युवकाला राजकारणाच व्यासपीठ मिळवून देणारे नेतृत्व आज आमदार झाले. गेली अनेक वर्षे आम्ही सत्यजीत तांबे यांच्यासोबत काम करतोय. सन 2011 साली आमच्या चचेगावला गावी आमचे मोठे बंधु, आमचे नेते शिवराज मोरे यांनी भेट घडवून आणला. सत्यजित तांबे हे एक अभ्यासू व्यक्तिमत्व असून आगामी काळात ते युवकाच्या व पदवीधराच्या प्रश्नासाठी आवाज उठवतील, यात शंका नाही. शिवराज मोरे यांच्या नेतृत्वात आम्ही सदैव काॅंग्रेस व सत्यजित तांबे यांच्यासोबत काम करू, असे अभिजीत पाटील म्हणाले.