नागपूर : हॅलो महाराष्ट्र – नागपूर जिल्ह्यातील सावनेर याठिकाणी एका महाविद्यालयाच्या प्राचार्यानं दारुच्या नशेत अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला आहे. एवढेच नाही तर पीडित मुलीनं आरडाओरडा केल्यानंतर मदतीसाठी धावून आलेल्या नागरिकांना देखील या प्राचार्यानं दमदाटी करण्याचा प्रयत्न केला आहे. रात्री उशीरा पीडित मुलीच्या आई-वडिलांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन या प्राचार्याच्या विरोधात तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी प्राचार्याला अटक करून घटनेचा पुढील तपास सुरु केला आहे.
अटक केल्या आरोपी प्राचार्याचं नाव वीरेंद्र केशव जुमडे असे आहे. तो नागपूर शहरातील गणेश पेठ परिसरातील मॉडेल मील येथील रहिवासी आहे. आरोपी हा सावनेर शहरातील डॉ. हरिभाऊ आदमने कला व वाणिज्य महाविद्यालयात प्राचार्य म्हणून कार्यरत आहे. एवढ्या मोठ्या पदावरील व्यक्तीनं दारुच्या नशेत 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्यानं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पीडित मुलगी ही डॉ. हरिभाऊ आदमने कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या पाठीमागे असणाऱ्या शेतातील घरात राहते. हे शेत जगदीश सावजी यांच्या मालकीचे आहे. पीडित मुलीचे आईवडिल हे शेतात कामाला आहेत.
गुरुवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पीडित मुलगी आपल्या घराच टीव्ही पाहत बसली होती. यावेळी आरोपी प्राचार्य दारुच्या नशेत तिच्या घरी गेला. यावेळी आरोपी प्राचार्यानं हाफ पँट घातली होती. यानंतर त्याने पीडितेच्या घरात घुसून तिच्यासोबत अश्लील चाळे करायला सुरुवात केली. त्यावेळी पीडित मुलीनं आरडाओरडा केला. या मुलीचा आवाज ऐकून शेतीचे मालक जगदीश सावजी आणि परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी दारुच्या नशेत असणाऱ्या प्राचार्य जुमडे यांनी नागरिकांना दमदाटी करून तिकडून हाकलून लावण्याचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती मिळताच पीडितेच्या आईवडिलांनी रात्री नऊच्या सुमारास पोलीस ठाणे गाठून आरोपी विरोधात तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत विनयभंगाच्या गुन्ह्यांत आरोपी प्राचार्य वीरेंद्र जुमडे याला अटक केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक सोनाली रासकर या घटनेचा पुढील तपास करत आहेत.