जालना – पैशांची मागणी पूर्ण करत नसल्याचा राग येऊन प्रेयसीने ऐन दिवाळीत आपल्याच हाताने प्रियकराला विष पाजल्याची धक्कादायक घटना जालन्यात घडली आहे. विष पोटात गेल्याने चार दिवसांपासून उपचार घेत असलेल्या प्रियकराने शुद्धीवर आल्यानंतर या संदर्भात कदीम जालना पोलीस ठाण्यात प्रेयसी महिलेविरुद्ध जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार दाखल केली. या प्रकरणी महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याविषयी पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, रमेश नाथाराम घुगे याने फिर्याद दिली आहे. रमेशचा मंडप डेकोरेशनचा व्यवसाय असून त्यातून तो कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतोय शहरातील शिवनगर भागातील एका अंगणवाडी सेविका महिलेसोबत त्याचे मागील दीड वर्षांपासून प्रेमसंबंध होते. सदर महिलेच्या घरी लागणाऱ्या अत्यावश्यक वस्तूंसह अन्य सामान तो खरेदी करून देत असे. अशा प्रकारे मागील दीड वर्षात प्रेयसीने आपल्याला मानसिक त्रास देऊन पाच लाख रुपये घेतले असल्याची माहिती रमेशने पोलिसांना दिली. दिवाळीच्या दिवशी प्रेयसीच्या एका नातेवाईकाने फोन करून प्रमोशनसाठी तुझ्या प्रेयसीला दहा लाख रुपयांची गरज असून सदर पैसे तू तिला दिल्यास यापुढे काहीच त्रास देणार नाही, असे सांगितले.
तसेच 06 नोव्हेंबर रोजी प्रेयसीने प्रियकराला फोन करून घरी बोलवले. त्यामुळे रमेश मंडप डेकोरेशनचे काम पाहणाऱ्या एका मुलाला घेून प्रेयसीच्या शिवनगर येथील घरी गेला. सोबत आलेला मुलगा बाहेरच थांबला. घरात गेल्यानंतर प्रेयसीने आपल्याकडे सीडीपीओ पदाच्या प्रमोशनसाठी दहा लाख रुपये हवे आहेत, अशी मागणी केली. तसेच तुला पैसे प्रिय आहेत का मी असा प्रश्न विचारत किचनमधून आणलेला एक ग्लास पाणी त्याला पाजले. ते पाणी प्यायल्यानंतर रमेशला उलट्या होऊ लागल्या. उलट्या होऊ लागल्याने रमेश त्या घरातील सिंकजवळ गेला. तेव्हा त्याला तिथे उंदिर मारण्यासाठी वापरण्यात येणारे औषध दिसले. त्यामुळे प्रेयसीने जीवे मारण्यासाठी विष पाजल्याचे लक्षात आले. मात्र जास्तच उलट्या होत असल्याने प्रेयसीने कामावरील मुलाला बोलावले व म्हणाली, आता हा माझ्या काहीच कामाचा नाही, याला घेऊन जा कामावरच्या मुलाने रमेशला जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर ते बेशुद्ध पडला. अशी माहिती रमेशने फिर्यादित दिली आहे. दरम्यान जालन्यातील मंठा चौफुली येथील श्रीकृष्ण हॉस्पिटलमध्ये रमेशनवर उपचार सुरु असून शुद्धावर आल्यानंतर रमेश घुगे याने रविवारी प्रेयसीविरुद्ध तक्रार दिली आहे. याप्रकरणी पोलीस तपास सुरु आहे.