औरंगाबाद – कोरोणाच्या प्रादुर्भावामुळे मागील दीड वर्षापासून शिक्षणाची मंदिरे शासनाने बंद करून ठेवली आहेत. पहिल्या लाटे नंतर काही दिवस ही मंदिरे उघडण्यात आली होती. परंतु, त्यानंतर दुसऱ्या लाटेने धुमाकूळ घातल्याने पुन्हा ही मंदिरे लॉकडाउन करण्यात आली होती. परंतु आता राज्यातील स्थानिक प्रशासनाच्या परवानगीने बारावी पर्यंतच्या शाळा चार ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. पण, महाविद्यालयांना अद्यापही ‘अनलॉक’ ची प्रतीक्षा कायम आहे.
पदवी महाविद्यालय सुरू करण्याच्या बाबतीत शासनाने अद्यापही निर्णय घेतला नसल्याने विद्यार्थी तसेच प्राचार्य संभ्रमात आहेत. छोट्या मुलांना प्रत्यक्ष वर्गात बसण्याची मुभा आहे, मग मोठ्या मुलांना का नाही ? असा प्रश्नही विद्यार्थी वर्गातून विचारण्यात येत आहे. पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा यावर्षी ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आल्या होत्या. बहुतांश अभ्यासक्रमांचा निकालही घोषित करण्यात आलेला आहे, तर काही महाविद्यालयांनी ऑनलाइन तासिका घेण्यासही सुरुवात केली आहे.
राज्य शासनाने शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतल्यानंतर पदवी स्तरावरील विद्यार्थी संभ्रमात आहेत. बहुतांश विद्यार्थ्यांनी आपले लसीकरण देखील पूर्ण केलेले आहे. कोरोना संसर्ग विषयी सुरक्षितता कशी घ्यावी, आरोग्य कसे सांभाळावे याची जाण विद्यार्थ्यांना आहे. असे असताना देखील महाविद्यालय सुरू न करणे प्रत्यक्ष वर्ग न भरवण यामागे नेमके कोणते लॉजिक लावले आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच महाविद्यालय सुरू करण्याबाबत निर्णय न झाल्याने पदवी स्तरावरील विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.