हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नागपूर ते मुंबईपर्यंतचा समृद्धी महामार्ग हा भारतातील पहिला आणि जगातील तिसरा सर्वात मोठा महामार्ग आहे. एकूण 710 किलोमीटर लांबीचा असलेला हा रस्ता तयार झाल्यानंतर नागपूर मुंबई हे संपूर्ण अंतर फक्त 6 तासात गाठणे शक्य होणार आहे. या महामार्गावरुन वाहने ताशी दीडशे किमी वेगाने धावू शकतात. मुंबई ते नागपूर या 701 किमी लांबीच्या समृद्धी महामार्गाचा 80 किमीचा शिर्डी ते भरवीर दुसरा टप्पा 26 मे 2023 पासून सर्वसामान्य जनतेस वाहतुकीसाठी खुला होणार असून या टप्प्याचे 2023 उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार आहे.
उद्घाटनानंतर हा मार्ग वाहतुकीसाठी खुला होणार असून शिर्डी ते भरवीर हे अंतर 40 ते 45 मिनिटांत आणि नागपूर ते भरवीर हे अंतर ६ तासांत कापता येणार आहे. राज्याची राजधानी आणि उपराजधानीमधील अंतर कमी करण्यासाठी एमएसआरडीसीने समृद्धी महामार्ग प्रकल्प सुरू केला आहे. मुंबई ते नागपूर या 701 किमी पैकी 520 किमीचा नागपूर ते शिर्डी रस्ता डिसेंबर 2022 मध्ये वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. तसे पाहता याआधीच शिर्डी ते भरवीर या टप्प्याचे उद्घाटन 1 मे रोजी होणार होते, मात्र मुख्यमंत्र्यांना वेळ मिळत नव्हता. आता या मार्गाचे उद्घाटन मुख्यमंत्री 26 मे रोजी दुपारी 3 वाजता शिर्डीत करणार आहेत.
भरवीर-इगतपुरीचे काम वेगाने सुरू आहे-
सध्या भरवीर ते इगतपुरी या टप्प्याचे काम वेगाने सुरू आहे. बांधकामाच्या दृष्टीने हा टप्पा आव्हानात्मक आहे. त्यामुळे हा टप्पा पूर्ण होण्यासाठी किमान चार महिन्यांचा कालावधी लागणार आहे. ह्या वर्षीच दसरा-दिवाळीच्या काळात हा टप्पा वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता एमएसआरडीसीने व्यक्त केली.