औरंगाबाद : वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने राज्यातील सलून दुकाने ३० एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे सलून व्यावसायिकांमध्ये तीव्र पडसाद उमटले आहेत. सलून व पार्लर बंद करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला नाभिक महामंडळाने तीव्र विरोध दर्शविला असून शासनाच्या निर्णयाची होळी महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या वतीने करण्यात आली.
दरम्यान, सलून व्यावसायिकांना आर्थिक मदत देऊनच सलून दुकाने बंदचा निर्णय घ्यावा अशी मागणी मुख्यमंत्र्यांना ई-मेलद्वारे पाठविण्यात आलेल्या निवेदनात मराठवाडा विभागीय अध्यक्ष विष्णू वखरे, जिल्हाध्यक्ष संभाजी वाघ यांनी केली आली. कोरोनाला रोखण्यासाठी राज्य सरकारने ‘ब्रेक दी चेन’ अभियानांतर्गत ३० एप्रिल पर्यंत रात्री संचारबंदी, विकएंडला लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. यात अत्यावश्यक वस्तूंची दुकाने वगळता सर्व प्रकारची दुकाने, मॉल्स, सलून, ब्युटी पार्लर दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे नाभिक कुटुंबावर उपासमारीची वेळ येणार आहे. वर्षभरापासून आधीच नाभिक बांधव संकटग्रस्त अवस्थेत आहेत. कोरोनामुळे व्यवसायावर दूरगामी परिणाम झाल्याने सलून व्यावसायिक बांधव आधीच मोठ्या अडचणीत आहेत. मागील वर्षीच्या लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या राज्यातील १६ सलून व्यावसायिकांनी आत्महत्या केल्या. ह्यावर्षी सलून व्यावसायिकांवर भयावह परिस्थिती आहे. शासनाने सलून बंद करण्याच्या निर्णयाबाबत पुनर्विचार करावा. अशी मागणी करत शासनाने घेतलेल्या निर्णयाची होळी ५ एप्रिलला कैलासनगर येथे करण्यात आली.