हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । लैंगिक विषयासंबंधी आजही आपल्या समाजात खुलेपणाने बोलले जात नाही. इतिहासात या महत्वाच्या विषयावर मोकळेपणाने बोलण्याचे धाडस दाखवणारा एकमेव समाजसुधारक होऊन गेला ते नाव म्हणजे र.धो.कर्वे. र.धो कर्वे यांचे लैंगिकतेबद्दलचे विचार आजच्या समाजालाही झेपणारे नाहीत. हा एक दुर्लक्षित समाजसुधारक आहे. धनंजय मुंडे यांनी विवाहबाह्य संबंध ठेवले म्हणून सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. त्यांच्या राजीनाम्याची मागणी होतेय. कर्वे यांनी त्या काळी समागम स्वातंत्र्याचा जोरदार पुरस्कार केलाय. ऐकमेकांच्या संमतीने कोणीही स्त्री पुरुष समागम करतील तो व्यभिचार नाही, समागम हा प्रत्येकाचा हक्क आहे असे विचार कर्वे यांनी मांडले. त्यांनी सेक्सकडे फक्त मुलं जन्माला घालणे इतक्या संकुचित नजरेने पाहिले नाही.
सेक्समधून होणारी सुखप्राप्ती ही मानवाची गरज आहे. समागम स्वातंत्र्यात विवाहसंस्थेचा अडथळा येत असेल तर तो ही व्यक्तीने बाजुला सारावा असे मत त्यांनी मांडले. त्यांनी फक्त पुरुषांच्या समागम स्वातंत्र्याचा पुरस्कार केला नाही तर स्त्रियांच्याही समागम स्वातंत्र्याचा पुरस्कार केला. पातीव्रत्याची कल्पना ही स्त्रीवर मालकी हक्क सांगायच्या पुरुषी वृत्तीतुन येते असे त्यांचे मत होते. त्याचबरोबर स्त्रीचं चारित्र्य हे तिच्या योनीत असते हा विचारही धुडकावून लावला. समाजस्वास्थ्य या मासिकातुन त्यांनी हे विचार निर्भीडपणे मांडले. स्त्रियांच्या लैंगिक स्वातंत्र्याचा जोरदार पुरस्कार करताना रधो कर्वे म्हणतात, कुमारी, विधवा, व परित्यक्ता यांनाही लैंगिक सुखाची इच्छा असते हे समाजाने मान्य करावे. समागम नैसर्गिक आहे त्यामुळे त्याचा हक्क प्रत्येक स्त्रीला मिळाला पाहिजे असे ते म्हणत.
असे विचार आजच्या काळातही जर तुम्ही मांडले तर तुमच्याकडे वेगळ्याच नजरेने बघितले जाईल. कर्वे यांनी तर त्या काळी असे विचार मांडले त्यामुळे याचे परिणाम तर त्यांना भोगावे लागलेच.
कर्वे गणिताचे प्राध्यापक होते. पण संततीनियमनाच्या कामामुळे त्यांच्यावर नोकरी गमावण्याचीही वेळ आली. त्यांच्या कार्याचा प्रसार करण्यासाठी त्यांनी 1927 साली समाजस्वास्थ्य हे मासिक सुरू केले होते. जर्मनीवरून आणलेल्या संततीनियमनाच्या साधनांची जाहिरात ते समाजस्वास्थ्य मधून करत असत. या मासिकातून त्यांनी स्त्री पुरुष लैंगिक संबंधाविषयी विचार मांडले. संततिनियमन हे फक्त विवाहितांसाठीच असते ही लोकांची भाबडी समजूत आहे.
संतीतनियमन हे प्रामुख्याने कोणत्याही भीतीशिवाय स्त्रियांना लैंगिक सुख घेता यावे यासाठी आहे असं रधो यांनी समाजस्वास्थ्यमधून वारंवार स्पष्ट केले. हे विचार तत्कालीन समाजव्यवस्थेला झेपले तरच नवल. समाजस्वास्थ्य मासिकांतून अश्लीलता पसरवत असल्याच्या आरोपाखाली त्यांच्यावर तीन वेळेस खटले दाखल केले. पहिल्या खटल्यात 100 रुपये दंड दुसऱ्या खटल्यात 200 रुपये आणि तिसरा खटला कर्वे जिंकले. सनातन्यांकडून त्यांचा छळ करण्यात आला.
कर्वे या सर्व संकटाशी एकाकी लढत होते. समाजस्वास्थ्य चालवण्यासाठी अशा अनेक अडचणी आल्या. पण त्यांनी हार मानली नाही. कर्वे यांनी जवळपास 27 वर्षे समाजस्वास्थ्य मासिक चालवलं. प्रवाहाविरुद्ध विचार मांडणं ते ही लैंगिक विषयाबद्दल ही सोप्पी गोष्ट नव्हती. कंडोमची जाहिरात tv वर लागली तर कोणी बघेल या भीतीने आपण चॅनेल बदलतो. ही आजची परिस्थिती. यावरून तुम्हाला कल्पना येईल की कर्वे यांना त्या काळी वेडसरच ठरवलं असणार.
रधो कर्वे बुद्धिप्रामाण्यवादी होते. त्यांनी आगरकरांचा वारसा पुढे चालवला. रधो म्हणायचे, नवऱ्याला देव माननारी स्त्री अत्यंत ढोंगी असते. स्त्रिया शिकतील, नोकरी करतील तर नवऱ्याला देव मानण्याचे त्यांचे ढोंग संपुष्टात येईल. स्वातंत्र्याचे पाणी अंगात मुरल्याशिवाय स्त्रियांची स्थिती कधीही सुधारणे शक्य नाही. कर्वे नास्तिक होते. धर्म म्हणजे मूर्खपणा असे त्यांचे मत होते. विचारशून्य लोकांकरिता धर्म असतो, विज्ञानाची वाढ होईल तसतसे धर्माची पिछेहाट होईल असे त्यांचे धर्माविषयी मत होते. कर्वे समान नागरी कायद्याचे पुरस्कर्ते होते. अतुल पेठे दिग्दर्शित ‘समाजस्वास्थ्य’ या नाटकामुळे या दुर्लक्षित, द्रष्ट्या समाजसुधारकाचं महत्वाचं कार्य मला समजलं. या नाटकातून रधो कर्वे यांचं हे महत्वाचं कार्य प्रभावीपणे अधोरेखित केलं आहे. या नाटकाचे प्रयोग बंद झाले आहेत. मात्र तुम्ही हे नाटक YouTube वर पाहू शकता. कर्वे यांच्या या प्रवासात त्यांची बायको मालतीबाई यांनी देखील मोलाची साथ दिली. संततीनियमनाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी त्यांनीही प्रयत्न केले.
रधों कर्वे यांची आज जयंती. जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन. त्यांच्या कार्याला सलाम.
– मयुर डुमणे