शहरातील सिद्धार्थ उद्यानाला जप्तीची नोटीस

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – मार्च महिना येतोय तसे सर्वच यंत्रणांचा वसुलीचे वेध लागले आहेत. औरंगाबादेतही महसूल विभागाने थकीत वसुलीवर लक्ष केंद्रित केले आहे. याच मालिकेत औरंगाबादमधील सिद्धार्थ उद्यानाकडेही मोठा कर थकल्याचे समोर आले आहे. वर्षानुवर्षे पाठपुरावा करूनही महापालिका सिद्धार्थ उद्यानाचा दीड कोटी रुपयांचा थकीत करमणूक कर भरत नसल्याने अखेर अप्पर तहसील कार्यालयाच्या वतीने मनपाला उद्यान जप्तीची नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच अकृषक करासह इतरही करांनी मागणी करण्यात आली आहे.

औरंगाबाद जिल्हा महसूल वसुलीत इतर जिल्ह्यांच्या तुलनेत पिछाडीवर आहे. केवळ याच कारणामुळे यंदा विभागीय नियोजन समितीच्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीत मागणीनुसार वाढ दिली नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने महसूलसह थकीत कर वसुलीवरही भर दिला आहे. महसूल विभागातर्फे महापालिकेला 1 कोटी 35 लाखांचा अकृषक कर भरावा, अशी नोटीसही बजावण्यात आली आहे.

जीएसटी सुरु होण्यापूर्वी महसूल विभागामार्फत करमणूक कर वसूल केला जात होता. आता ही वसुली बंद असली तरी काही विभागांकडे अगोदरचा कर थकलेला आहे. त्याची वसुली महसूल विभाग करीत आहे. सिद्धार्थ उद्यानाकडेही दीड कोटींचा कमरणूक कर थकलेला आहे. अनेक वर्षांपासून पाठपुरावा करूनही मनपा या कराचा भरणा करीत नसल्याने अखेर अप्पर तहसील कार्यालयाच्या वतीने मनपाला सिद्धार्थ उद्यान जप्तीची नोटीस बजावण्यात आली आहे. त्यावरून मनपाने कर भरणा करण्याची तयारी दर्शवली असल्याची माहिती महसूल विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.