Wednesday, October 5, 2022

Buy now

महाराष्ट्र केसरीसाठी निवड : कालेतील आसिफ शेख खेळणार मॅटवरील कुस्ती

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कराड तालुक्यातील काले गावचा सुपुत्र आसिफ शेख (वय-24) यांची ठाणे शहर कडून 97 किलो वजन गटातील मॅट विभागातून महाराष्ट्र केसरीसाठी निवड झाली आहे. गेल्या 14 वर्षापासून मी कुस्ती खेळत असून आजोबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी संधी मिळाल्याची प्रतिक्रिया आसिफने हॅलो महाराष्ट्रशी बोलताना दिली.

आसिफच्या घरची परिस्थिती हालाखीची असतानाही वडिल मन्सूर मन्सूर नूरमोहम्मद शेख मुलांच्या कुस्तीसाठी काहीही कमी पडू देत नाहीत. घरी 18 गुंठे शेती असून त्याबरोबर चिकन विक्रीचा व्यवसाय वडिल करत आहेत. मुलगा पैलवान झाला पाहिजे, या उद्देशाने आई- वडिल कष्ट घेत आहेत. मन्सूर शेख यांच्या कुटुंबात पत्नी व आसिफ हा एकुलता एक मुलगा आहे.

आसिफ हा जय हनुमान तालीम काले या ठिकाणी कुस्तीचा सराव करत आहे. वस्ताद दत्तात्रय पाटील यांच्या नेतृत्वाखाली तो महाराष्ट्र केसरी स्पर्धा लढणार आहे. अवघ्या वयाच्या 10 व्या वर्षापासून आजोबांच्या मार्गदर्शनाने कुस्ती खेळायला सुरूवात केली. आजपर्यंत महाराष्ट्रातील प्रत्येक मैदानावर आजोबा सोबत होते. गेल्या दोन वर्षापूर्वी आजोबाचे निधन झाले, मात्र महाराष्ट्र केसरी निवडीने आजोबांचे स्वप्न पूर्ण करण्याची संधी मिळाली आहे. असिफचे शिक्षण महात्मा गांधी विद्यालय काले, कृष्णा फाउंडेशन वाठार येथे झाले आहे.

असिफ दररोज कुस्तीचा दररोज किमान 5 तास सराव करत आहे. घरची परिस्थिती हालखीची असतानाही त्याचे आई- वडिल प्रत्येक महिन्याला कुस्तीसाठी 7 ते 8 हजार रूपये खर्च करत आहेत. ठाणे येथे 6 पैलवानासोबत कुस्ती झाल्यानंतर महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी असिफची निवड झाली.