हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुधीर जोशी यांचे आज निधन झाले. वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब यांचे अत्यंत जवळचे सहकारी अशी सुधीर जोशी यांची ओळख होती. सुधीर जोशी यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर मुंबईतल्या जसलोक हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. नुकतेच ते कोरोनाच्या आजारातून घरी परतले होते परंतु अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.
शिवसेनेच्या सुरुवातीच्या काळात पक्षबांधणीसाठी सुधीर जोशी यांचे मोठे योगदान मानले जाते. सुधीर जोशी १९६८ च्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत पहिल्यांदा निवडून येऊन नगरसेवक बनले. त्यानंतर १९७३ च्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेला मोठे यश प्राप्त झाले. या टर्मला जोशी यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे महापौरपद देखील भूषवले.
१९८६ ते १९९९ पर्यंत त्यांनी विधानपरिषदेचे आमदार म्हणून कारकीर्द गाजवली होती. १९९२ ते १९९५ दरम्यान ते विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते देखील होते. सेना-भाजप युती सरकारच्या काळात त्यांनी मंत्रिपद भूषवले. आजारपणामुळे त्यांनी १९९९ मध्ये सक्रीय राजकारणातून निवृत्ती घेतली. प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते फारसे सार्वजनिक जीवनातही दिसत नव्हते.