सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
साताऱ्याचे भाजपचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याबद्दल इंदापूर येथील एका उद्योजकाने अपशब्द वापरीत त्यांचा गुंड असा उल्लेख केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर उदयनराजेंच्या समर्थकांनी त्या उद्योजकाला चोप देत त्याचे कपडे फाडून तोंडाला काळेही फासले होते. या प्रकरणी आता पोलिसांनी उदयनराजेंच्या सात समर्थकांवर कारवाई केली आहे. तसेच त्यांना अटकही केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, इंदापूर येथील एमआयडीसी कंपनीचा मालक असलेल्या अशोक जिंदाल या नावाच्या उद्योजकाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये तो खासदार उदयनराजे भोसले यांचा उल्लेख गुंड असा करताना दिसून येत आहे. त्याच्या व्हीडीओवरून खासदार उदयनराजेंच्या समर्थकांनी त्या उद्योजकाचा शोध घेतला. तसेच उद्योजकाच्या तोंडाला काळे फासले, त्याचे कपडे फाडले तसेच त्याची धिंडही काढली. या प्रकरणी आता संबंधित युवकांविरोधात बेकायदेशीरपणे जमाव जमविणे, कॅव्हिडच्या नियमांचे पालन न करणे तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी अटक केलेल्या युवकांमध्ये दीपक उर्फ अण्णा सीताराम पवार ( वय २८, रा. सरस्वती नगर, इंदापूर), अमोल अंकुश पवार (वय २५, रा. गांधी चौक, अकलूज), कुणाल शिवाजी चव्हाण (वय 33, रा. विजय चौक अकलूज, ता. माळशिरस), प्रदीप चंद्रकांत भोसले (वय २४, रा. राऊत नगर, अकलूज) किरण रवींद्र साळुंखे (वय 27, रा. भाग्यनगर, ता. इंदापूर), अक्षय चंद्रकांत चव्हाण (वय 25, श्रीराम नगर, ता.बारामती), सुनील विठ्ठल रायकर (वय 23, राऊत नगर, अकलूज) अशी नावे आहेत. या सर्वांवरती गुन्हाही दाखल करण्यात आल्याची माहिती शुक्रवारी पोलिसांनी दिली.