अनेक संपकरी एसटी कर्मचारी कामावर परतले; आतापर्यंत ‘इतके’ कर्मचारी परतले कामावर

औरंगाबाद – एसटी महामंडळाचे कर्मचारी 8 नोव्हेंबरपासून संपावर आहेत. एसटीचे शासनात विलीनीकरण करण्याच्या मुख्य मागणीसाठी कर्मचारी संपावर आहेत. एसटी महामंडळाच्या औरंगाबाद विभागात संपकरी अनेक कर्मचारी आता कामावर परतत आहेत. तीनच दिवसांत कामावर हजर असलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या 358 वरून 473 झाली आहे. कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांना पोलीस संरक्षण दिले जात आहे.

तब्बल 28 दिवसांपासून कर्मचाऱ्यांचा संप सुरूच आहे. एसटी महामंडळाच्या औरंगाबाद विभागाला दररोज 50 लाख रुपयांचे उत्पन्न मिळते; परंतु संपामुळे या उत्पन्नावर सध्या पाणी फेरले जात आहे. आतापर्यंत औरंगाबाद विभागाचे 14 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती विभाग नियंत्रक अरुण सिया यांनी दिली. संपावरील कर्मचाऱ्यांवर निलंबन, सेवा समाप्ती आणि बदली अशी कारवाई करण्यात आली. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून विभागात कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. संप लांबत असल्याने अनेक जण आता कामावर परतत असल्याची परिस्थिती आहे. यामध्ये कार्यालयीन आणि यांत्रिकी कर्मचाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे.

चालक-वाहक मात्र संपावर ठाम
विभागात एक हजार 72 चालक आहेत, तर 850 वाहक आहेत. यातील 16 चालक आणि 8 वाहक कामावर हजर आहेत; परंतु अजूनही बहुसंख्य चालक-वाहक संपावर ठाम आहेत. जोपर्यंत एसटी शासनात विलीन होत नाही, तोपर्यंत कामावर जाणार नाही, असा चालक-वाहकांचा पवित्रा कायम आहे.