हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| जानेवारी महिन्याच्या सुरुवातीलाच राज्यात पावसाने आगमन केले. यामुळे नागरिकांना थंडीसह पावसाचा देखील सामना करावा लागला. परंतु आता राज्यात पुन्हा थंडी वाढेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. राज्यातील बहुतांश ठिकाणी हवामान हे कोरडे राहील, त्यामुळे थंडी जास्त वाढण्याची शक्यता आहे.
गेल्या दोन दिवसांपासून पश्चिमेकडून येणारे थंड वारे आणि आग्नेय दिशेने येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांच्या संयोगामुळे राज्यात पावसाने हजेरी लावली होती. या काळात कोकणासहित मराठवाडा औरंगाबाद भागात देखील पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. तसेच, रत्नागिरीमध्ये 0.5 पाऊस पडला. यात पुणे शहरात देखील मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. परंतु आता पाऊस ओसरल्यानंतर थंडीचे प्रमाण वाढत चालले आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आजपासून राज्यातील ढगाळ वातावरण कमी होईल. मात्र कोरडे वातावरण राहून थंडी वाढत जाईल. याकाळात किमान तापमान चार ते पाच अंश सेल्सिअसने कमी होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. महत्वाचे म्हणजे, पुढील काही दिवसात विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात जास्त थंडी पडण्याची शक्यता आहे.
दरम्यान, देशविदेशांचा आढावा घेता अद्याप अनेक देशांमध्ये थंडी पडलेली नाही. मात्र काश्मीरमध्ये थंडीचे प्रमाण चांगलेच वाढले आहे. तर स्कीइंगसाठी अजूनही हिमवृष्टी झालेली नाही. जागतिक हवामानातील बदलांमुळे हे बदल दिसून येत असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. तसेच, आता महाराष्ट्रात कडाक्याची थंडी पडणार असल्यामुळे नागरिकांना शेकोटीची तयारी करावी लागणार आहे.