पुण्यात एकतर्फी प्रेमातून तरुणाने विवाहित महिलेसोबत केले ‘हे’ विकृत कृत्य

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुण्यात एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून आपल्याच नात्यातील एका विवाहित महिलेचा छळ केला आहे. या आरोपी तरुणाने नातेवाईक असणाऱ्या विवाहित महिलेला जबरदस्तीने मिठी मारून तिचे फोटो काढले. एवढेच नाहीतर त्याने हे फोटो पीडितेच्या नवऱ्याला आणि अन्य नातेवाईकांना पाठवले आहे. या प्रकरणी 28 वर्षीय पीडित महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात आरोपी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

21 वर्षीय आरोपी तरुणाचे नाव मारुती विठ्ठल येरदे असे आहे. आरोपी तरुण हा फिर्यादी महिलेचा नातलग आहे. त्याचे पीडितेच्या घरी नेहमी येणे जाणे असायचे. याशिवाय पीडित महिला कामाला जात असताना, संबंधित तरुण नेहमी तिचा पाठलाग करत असायचा. तसेच काही वेळा तो पीडितेच्या घरी राहायला देखील यायचा. आरोपी पीडितेच्या घरी वास्तव्याला असताना, त्याने अनेकदा फिर्यादी महिलेशी अश्लील संवाद साधण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच पीडिता घरात एकटी असताना तिला जबरदस्तीने मिठीसुद्धा मारण्याचा प्रयत्न करायचा.

तसेच पीडित महिला घरात झोपलेली असताना, आरोपीने झोपेत तिचे अनेक फोटो देखील काढले आहेत. तसेच त्या फोटोंवर अश्लील मजकूर लिहित तरुणाने हे फोटो पीडित महिलेच्या पतीला आणि नातेवाईकांना पाठवून तिची बदनामी करण्याचा प्रयत्न केला आहे. आरोपीच्या सततच्या त्रासाला कंटाळून पीडित महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात जाऊन आरोपी मारुती येरदे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अद्याप अटक केली नसून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. पोलिसांनी पीडित महिलेच्या फिर्यादीनुसार विनयभंगासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसेच लवकरच आरोपीला गजाआड करण्याचे आश्वासन पोलिसांनी दिले आहे.