सातारा प्रतिनिधी : शुभम बोडके
सातारा येथील कोटेश्वर मैदान परिसरात युवकास कोयत्याचा धाक दाखवून मारहाण करत लुटल्याची घटना घडली होती. याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात बकासूर गँग या नावाने दहशत माजविणाऱ्या टोळक्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. गुन्हा नोंद असणाऱ्यांपैकी सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडे चौकशी सुरू आहे.
याबाबत शाहूपुरी पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कोटेश्वर मैदान परिसरात शनिवारी दुपारी एक अल्पवयीन महाविद्यालयीन युवक मित्रासोबत आला होता. याठिकाणी दोघेजण चर्चा करत असतानाच तेथे धनराज घोडके, यश जांभळे, शिवम माने, आदित्य गोसावी व इतर युवक आले. त्यांनी मित्रासोबत थांबलेल्या त्या अल्पवयीन महाविद्यालयीन युवकास बोलावून घेतले. त्याला कोयत्याचा धाक दाखवत पैसे मागितले. पैसे नसल्याचे सांगताच त्यांनी युवकाला मारहाण केली. मारहाण करतानाच त्यांनी युवकाकडील पैशाचे पाकीट, तसेच मनगटी घड्याळ हिसकावून घेतले.
याचवेळी त्याठिकाणी घोडके, जांभळेचे इतर साथीदार आले. त्यांनी महाविद्यालयीन युवकास मारहाण करत त्याच्या हातातील अंगठी, तसेच कानात असणारी सोन्याची बाळी ओढण्याचा प्रयत्न केला. सुरू असणारा गोंधळ पाहून त्या महाविद्यालयीन युवकाचे इतर मित्र आले. त्यांनाही घोडके, जांभळे व इतरांनी मारहाण करत कोयत्याने धाक दाखवला. याची माहिती मिळाल्यानंतर शाहूपुरी पोलिस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी त्याठिकाणी दाखल झाले.
पोलिस आल्याचे पाहून काही जणांनी त्याठिकाणाहून पळ काढला. त्यावेळी पोलिसांनी पळणाऱ्या काही युवकांना पाठलाग करून ताब्यात घेतले. याची फिर्याद संबंधित मारहाण झालेल्या युवकाने नोंदवली असून, यात त्याने घोडके, जांभळे व इतरांनी 440 रुपयांची रोकड असणारे पाकीट आणि मनगटी घड्याळ हिसकावून नेल्याचे म्हंटले आहे. युवकाच्या फिर्यादीनंतर पोलिसांनी बकासूर गँगवर गुन्हा केला असून आहे. या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक संजय पतंगे करीत आहेत.