शेतकऱ्यांचा विरोध असलेला ‘हा’ महामार्ग बंद करावा लागेल; हसन मुश्रीफ थेटच बोलले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्य शासनाने नागपूर ते गोवा असा शक्तिपीठ महामार्ग (Shaktipeeth Highway) बांधण्याचे काम हाती घेतले असून २७ हजार एकर जमीन संपादित केली जाणार आहे. मात्र पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी या महामार्गाला कडाडून विरोध केला असून पश्चिम महाराष्ट्रात आंदोलनाची मालिका सुरु झाली आहे. या एकूण सर्व प्रकरणाचा महायुतीच्या नेत्यांनी चांगलाच धसका घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचा विरोध असलेला ‘हा’ महामार्ग बंद करावा लागेल असं मोठं विधान वैद्यकीय शिक्षणमंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी केलं आहे.

याबाबत हसन मुश्रीफ यांनी पत्रक काढून म्हंटल कि, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लोकसभेच्या निकालाबाबत कारणमीमांसा करण्यासाठी मुंबईत पक्षाची बैठक घेतली होती. त्यामध्ये शक्तिपीठ महामार्गामुळे शेतकऱ्यांच्या नाराजी व संतापाला सामोरे जावे लागण्याचे प्रमुख कारण आपण स्पष्ट केले. ही बाब उपमुख्यमंत्री पवार यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत आपल्यासमवेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याही निदर्शनास आणून दिली. शक्तीपीठ महामार्ग कागल मधील १५, राधानगरी – भुदरगड मतदार संघातील ३० गावातून जात असताना त्यास शेतकऱ्यांचा विरोध आहे. त्यांना विरोधात घालणारी एक यंत्रणा कार्यरत होती. त्यामुळे शक्तीपीठ प्रस्ताव महामार्ग रद्द व्हावा अशी मागणी करण्यात आली आहे.

तसेच आपल्याला दुसरा कोणता पर्यायी मार्ग सुद्धा नको आहे. कोल्हापूर जिल्ह्यात रस्त्याचे जाळे आधीच पसरलं आहे . त्यामुळे या नवीन महामार्गाची आवश्यकता नाही. तसेच हा प्रस्तावित शक्तिपीठ महामार्ग रद्द करून पर्यायी मार्ग करा, असे म्हणणेही संयुक्तिक आणि योग्य नाही. प्रसंगी कोणतीही किंमत मोजून हा महामार्ग रद्द करण्यासाठी प्रयत्न करू, असे मुश्रीफ यांनी या पत्रकात म्हटले आहे. निकालानंतर अवघ्या आठवड्याच्या आतच महायुतीच्या नेत्यांनी शक्तिपीठ महामार्गाचा किती धसका घेतला आहे हेच यातून दिसते.