कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कोरोनाचे महाराष्ट्रावर मोठे संकट असतानाही इतर राज्यांच्या तुलनेत केंद्र सरकारकडून अपेक्षित सहकार्य मिळत नाही. राज्याच्या हक्काचा निधीही दिला जात नाही. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राला कमी पैसे मिळत असल्याचा आरोप गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केला. कराड येथील शासकीय विश्रामगृहात पालकमंत्री बाळासाहेब पाटील व गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांची संयुक्तीत पत्रकार परिषदेत झाली. त्यावेळी ते बोलत होते.
पालकमंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सातारा जिल्ह्यात पुन्हा पाच दिवस कडक व पाच दिवस अंशतः लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. यास जनतेने चांगल्या प्रकारे सहकार्य केले आहे. जनतेनेच पुढाकार घेतल्याने कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यश मिळेल. तर जिल्ह्यात मृत्यूदर वाढत आहे. वेळेत उपचार घेतले तर हा धोकाही टाळता येऊ शकतो. या पार्श्वभूमीवरही नागरिकांनी दक्षता घेण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
मंत्री देसाई म्हणाले, कराड शहरातील एन्ट्री पॉईंट व कटेनमेंट झोनची पाहणी केली. तसेच मालखेड फाटा येथे जिल्हा चॅकपॉईटलाही भेट देऊन पाहणी केली आहे. या ठिकाणी चोवीस तास पोलीस यंत्रणा काम करत आहे. कायदा सुव्यवस्थेची माहिती घेण्यात आली असून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाय योजना करावयाच्या आहेत त्या सर्व उपाययोजना केल्या आहेत. तसेच पाटण, सातारा, कराडची मी स्वतः पाहणी केली आहे. लोकांनी स्वयंशिस्त पाळली आहे. लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशीच प्रशासनाने आवाहन करण्यापूर्वीच नागरिक घराबाहेर पडले नाहीत. कोरोनाचा संसर्ग रोखण्याची जबाबदारीही नागरिकांची आहे. लॉकडाऊन यशस्वीपणे पाळला गेला तर काही प्रमाणात कोरोनावर यश मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करून कोरोनाच्या संकटात केंद्र सरकार राज्याला अपेक्षित सहकार्य करत नाही. राज्याच्या हक्काचा निधीही दिला जात नसल्याचा आरोपही मंत्री देसाई यांनी केला.