ठाकरेंशी संपर्क साधणारा दुसरा शंभूराज देसाई कोण त्याला समोर आणाच, अन्यथा…

shambhuraj desai vinayak raut
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
शिंदे गटातील आमदार नाराज असून शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी उद्धव ठाकरेंना फोनही केला असा मोठा दावा शिवसेना खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून दिली होती. त्यांनतर मंत्री शंभूराज देसाई यांनी इशारा दिल्यानंतर मी दुसऱ्या शंभूराज देसाईंबद्दल बोललो असं म्हणत विनायक राऊत यांनी आपल्या विधानावर खुलासा केला. मात्र मी सोडून दुसरा असा कोणता शंभूराज आहे जो थेट ठाकरेंशी संपर्क साधू शकतो ते विनायक राऊत यांनी सांगावं असं खुलं आव्हान मंत्री शंभूराज देसाई यांनी परत एकदा दिले आहे.

सातारा येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना शंभूराज देसाई म्हणाले, विनायक राऊत यांच वक्तव्य खोटं होतं त्यामुळे त्यांनी पळवाट काढत काल्पनिक शंभूराज उभा केला. मी त्यांना कायदेशीर नोटीस दिल्यानंतर विनायक राऊत म्हणत आहेत की, शंभूराज देसाईंच्या बाबतीत मी बोललो नाही, दुसरे एक शंभूराज देसाई आहेत जे उद्धव ठाकरेंच्या संपर्कात आहेत. पण खरं पाहिले तर मी सोडलो तर दुसरा कोणताही शंभूराज शिंदे साहेबांसोबत नाही. त्यामुळे मला आज पुन्हा त्यांना आव्हान द्यायचं आहे की, तो दुसरा शंभूराज देसाई नेमका कोण तो समोर आणा.

आम्ही 25 वर्ष शिवसेनेत काढली पण आमचा उद्धव ठाकरेंशी कधीच थेट संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे हा एवढा मोठा दुसरा शंभूराज देसाई कोण आहे ज्याचा थेट ठाकरेंशी संपर्क झाला आणि मग त्यांनी ते विनायक राऊत यांना सांगितलं हे त्यांनी स्पष्ट करावं. अब्रुनुकसानीच्या दाव्याला सामोरे जावे लागेल मग त्यातून वाचण्यासाठी आणि पळवाट काढण्यासाठी विनायक राऊत यांनी हा दावा केला परंतु मी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे देसाई यांनी सांगितले आहे.