कराड | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबई येथील निवासस्थानी आज एस. टी. कर्मचारी आंदोलकांनी हल्ला केल्याची घटना घडली. पवार यांच्या सिल्वर ओक वर आंदोलनकर्त्यांनी चप्पल अन् दगड फेकून मारल्याचे व्हिडिओ समोर आले आहेत. यानंतर देशभरातून अनेक नेत्यांकडून या घटनेचा निषेध नोंदवण्यात येत आहे. यापार्श्वभुमीवर राज्याचे गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांच्यासोबत हॅलो महाराष्ट्रने EXCLUSIVE बातचीत केली. यावेळी, आता गप्प बसणार नाही. पवार साहेबांच्या घरावर हल्ला करणार्या एकेकाला शोधून काढणार अन् कायदेशीर कारवाई करणार असल्याची माहिती मंत्री देसाई यांनी दिली.
हा प्रकार एस टी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाशी संबंधित आहे. त्यांच्यातील एका गटानं हे काम केलं आहे. हे अतिशय खालच्या दर्जाचं काम केलं आहे अशा शब्दात देसाई यांनी या घटनेचा निषेध नोंदवला आहे. मुळातच या आंदोलनासंदर्भ, उच्च न्यायालयाने एक आदेश दिला. आझाद मैदानावरील आंदोलकांनीही न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत करून फटाके वाजवले, गुलाल उधळला. निर्णय झाल्यानंतर अनेक एस कर्मचारी आंदोलनाच्या जागेवरून आपापल्या गावी गेले. मात्र आज एका गटाने शरद पवारांच्या निवासस्थानी जाऊन असं आंदोलंन करणं हे निंदनीय आहे, चुकीचं आहे, अन खालच्या स्तराचं आहे असे मत देसाई यांनी व्यक्त केले आहे.
आमचे पोलीस अन आमचं गृहखाते यावर केवळ हाताची घडी घालून गप्प बसणार नाही. मी या अगोदरच मुंबईच्या आयुक्तांशी याबाबत फोनवर बोललो आहे. गृहमंत्री वळसे पाटील यांनीही आयुक्तांना याबाबत तसे आदेश दिले आहेत. लवकरच यातील दोषींना शोधू त्यांच्यावर कारवाई केली जाईल असे देसाई यांनी हॅलो महाराष्ट्रसोबत बोलताना सांगितले.
आता पोलिस गप्प बसणार नाहीत. एक अन एक व्यक्ती जो यांच्यामध्ये प्रत्यक्ष सहभागी होता तसेच त्याला हि कृती करायला लावण्या पाठीमागे कोण आहे? त्याला प्रवृत्त करणार कोण आहे? त्याला अशा पद्धतीने भडकावणार कोण आहे? या सगळ्या गोष्टीचा तपास आमचे पोलीस करतील. अन जे यात सहभागी असतील त्यांच्यावर कायद्यानुसार कडक कारवाई केली जाईल असे आश्वासन गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी दिले आहे.