हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेत बंडखोरी होण्यापूर्वी एकनाथ शिंदे हे मातोश्रीवर येऊन रडले होते, भाजपसोबत गेलो नाही तर आपल्याला अटक होईल असं त्यांनी तेव्हा म्हंटल होत असा मोठा गौप्यस्फोट ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केला आहे. आदित्य ठाकरेंच्या या दाव्याने मोठी राजकीय खळबळ उडाली आहे. मात्र आदित्य ठाकरेंचं विधान फक्त एकनाथ शिंदेंच्या बदनामीसाठी आहे, त्यांनी पुरावे द्यावेत असं म्हणत राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी ठाकरेंचा दावा खोडून काढला आहे.
सातारा येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना शंभूराज देसाई म्हणाले, आदित्य ठाकरेंनी अपुऱ्या माहितीच्या आधारवर हे विधान केलं आहे. शिंदे साहेबांचा स्वभाव आम्ही जवळून बघितला आहे, त्यांच्या कामाची पद्धत आम्हाला माहित आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे रडणारे नाहीत तर कोणताही प्रसंग आला तरी त्याला सामोरे जाणारे आहेत. आदित्य ठाकरे केवळ शिंदेंची बदनामी करण्यासाठी अशा प्रकारची विधाने करत आहेत. शिंदेना जेलची भीती वाटावी असे कोणतेही काम त्यांनी केलेलं नाही.
लोकांसाठी काम करणारा आणि अनाथांचा नाथ अशी एकनाथ शिंदेंच्या कामाची पद्धत आहे. महापूर, अतिवृष्टी , दुष्काळ, गारपीठ अशी कोणतीही संकटे आली तरी एकनाथ शिंदे जनतेसाठी 24 तास धडपडत असतात. राज्यात त्यांना जनतेकडून मोठी लोकप्रियता मिळत आहे, लोकांचा पाठिंबा मिळतोय. हे ज्यांना पाहवत नाही ते लोक त्यांच्या बदनामीसाठी अशा प्रकारची विधाने करत असतात, त्यांनी अशी विधाने करत असताना पुरावे द्यावे असं म्हणत शंभूराज देसाई यांनी आदित्य ठाकरेंवर पलटवार केला आहे.
आदित्य ठाकरेंचा नेमका खुलासा काय?
हैद्राबादमधील गितम विद्यापीठाच्या आयोजित कार्यक्रमात बोलताना आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. बंडखोरी करण्यापूर्वी एकनाथ शिंदे मातोश्रीवर आले होते. भाजपसोबत गेलो नाही तर मी तुरुंगात जाईन असं म्हणत ते त्यावेळी रडले होते असं आदित्य ठाकरेंनी सांगितलं. तसेच शिंदेंसोबत गेलेले 40 आमदार हे स्वत: साठी आणि पैशांसाठी गेले आहेत. केंद्रीय यंत्रणांकडून त्यांना अटक होणार होती, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.