हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपने कोणाला तरी मुख्यमंत्री करून सध्याच्या विद्यमान मुख्यमंत्र्यांना ढकलून दिले तरी काही पडणार नाही असं विधान काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केल्यांनतर आता शिंदे गटाचे आमदार आणि राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी त्यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी आधी आपल्या पाठीमागे किती आमदार आहेत हे पाहावं आणि बोलताना विचार करावा असं शंभूराज देसाई यांनी म्हंटल.
सातारा येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना शंभूराज देसाई म्हणाले, आमच्या नेत्याच्या मागे 50 आमदार आणि 13 खासदार आहेत. ते त्यांचे एकमुखी नेतृत्व मानतात. भाजप कोणाजवळ जाते किंवा कोणी भाजपकडे जात असेल तरी आमच्या महायुतीवर त्याचा काहीही परिणाम होणार नाही. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांनी आधी आपल्या पाठीमागे किती आमदार आहेत हे पाहावं, त्याच आत्मपरीक्षण करावं आणि मग बोलावं असा पलटवार शंभूराज देसाई यांनी केला.
पृथ्वीराज चव्हाण नेमकं काय म्हणाले होते?
अजित पवार आणि भाजप यांच्याबाबतीत सुरु असलेल्या चर्चेवरून पृथ्वीराज चव्हाण यांनी भाष्य केलं होते. एखादया आमदाराने पक्ष सोडला तर त्याचे सदस्यत्व रद्द होईल त्यामुळे कोणी असं काहीही करणार नाही. या सगळ्या वावड्या आहेत. सध्याच्या राजकीय दृष्टचक्रातून बाहेर पडण्यासाठी भाजपने काहीही केलं, कोणालाही मुख्यमंत्री केलं आणि विद्यमान मुख्यमंत्र्यांना ढकलून दिले तरी काही पडणार नाही. कोणाला तरी नवीन लोकांना घेण्यासाठी विद्यमान मुख्यमंत्र्यांचा बळी देण्यात येऊ शकतो अशा चर्चा सुरु आहेत हे गंभीर आहे असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हंटल होते.