महाबळेश्वर प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
महाबळेश्वर तालुक्यातील एरंडेल या गावावर असलेला कडा सुटल्याने येथील ग्रामस्थांची गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी भेट घेतली. यावेळी त्यांच्याशी चर्चा करीत त्यांना दिलासाही दिला. एरंडल गावाच्या पुर्नवसनाचा प्रस्तावाचा आपण पाठपुरावा करून चार कि. मी. मध्येच गावाचे पुनर्वसन करण्यात येईल, असे आश्वासन गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी एरंडल ग्रामस्थांना दिले.
गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी एरंडल गावास दिलेल्या भेटीवेळी माजी आमदार सदाशिव सपकाळ हे उपस्थित होते. जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे महाबळेश्वर तालुक्यात हाहाकार माजला होता. अनेक गावांवर दरडी कोसळण्याचा धोका उद्भवल्याने अशा गावातील ग्रामस्थांचे स्थालांतर करण्यात आले होते. अतिवृष्टीमुळे एरंडल गावावर कडा कोसळला तर कडयाखाली गाव गाडले जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे या गावातील ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. भितीच्या सावटाखाली गावकरी आपला एक एक दिवस काढत आहेत. अशा गावाला गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी भेट दिली.
यावेळी ग्रामस्थांशी त्यांनी संवाद साधला व त्यांना धीर दिला. ग्रामस्थांची चर्चा करताना गावाने गेली पंधरा वर्षा पुर्वीच पुर्नवसनाचा प्रस्ताव शासनास सादर केला असल्याची माहिती दिली. त्यावेळी भुतज्ञांनी गावाला भेट देवुन पाहणी करून गावाचे पुर्नवसन करणे आवश्यक असल्याचा अहवाल सादर केला होता. पतंगराव कदम हे त्यावेळी वनमंत्री होते. डोंगर माथ्यावर एरंडल गावाच्या पुर्नवनासाठी वन विभागाच्या एका भुखंडाची निवड देखिल करण्यात आली होती. परंतु पुढे हा प्रस्ताव शासनाच्या लाल फितीत अडकल्याने आज अखेर या गावाचे पुर्नवसन झाले नाही, अशी माहिती ग्रामस्थांनी मंत्री देसाई यांना दिली.
यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख यशवंत घाडगे, माजी जिल्हा प्रमुख राजेश कुंभारदरे उपस्थित होते. महाबळेश्वर शिवसेना शाखेच्या वतीने पुरग्रस्त एरंडल ग्रामस्थांना अन्नधान्याचे किट व पाचगणी शहर शिवसेना शाखेच्या वतीने भाजीपाला याचे वाटप करण्यात आले.