कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
पाटण तालुक्यातील मोरणा विभागातील आंबेघर येथील काही घरे मातीच्या ढिगाऱ्याखाली गेली आहेत. तर अजूनही तीन कुटुंबातील लोक रात्रीपासून बेपत्ता आंबेत. या गावासह पाटण तालुक्यातील इतर नुकसानग्रस्त गावांना शुक्रवारी दुपारी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी भेट दिली. यावेळी मंत्री देसाई म्हणाले की, गेल्या चाळीस ते पन्नास वर्षात अशा पद्धतीचा पाऊस पडला नव्हता. मात्र, सध्या होत असलेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात घरे, कुटुंबांचे नुकसान झाले आहे. त्यांना शासनाच्यावतीने मदत कार्य पोहचविण्याचे प्रयत्न केले जात आहेत.”
पाटण तालुक्यातील मोरणा विभागात असणाऱ्या डोंगरलगत आंबेघर हे गाव वसले आहे. या गावाच्या पाठीमागे मोटब डोंगर असल्याने येथे राहणाऱ्या ग्रामस्थाना जीव मुठीत धरून राहावे लागत आहे. दरम्यान, गुरुवारी रात्री घडलेल्या दरड कोसळण्याच्या घटनेमुळे संपूर्ण पाटण तालुका हादरून गेला आहे. या घटनेची माहिती मिळताच पाटण तालुक्याचे आमदार तथा गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी अतिवृष्टीचा तडाखा बसलेल्या आंबेघरसह इतर गावांना भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी शेखर सिह यांच्यासह एनडीआरएफचे दोन पथक, तहसीलदार, प्रांताधिकारी यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
प्राथमिक माहितीनुसार खालचे आंबेघर येथील चार घरे या मातीच्या ढिगार्याखाली गेली आहेत. यामध्ये वसंत कोळेकर, ज्ञानजी कोळेकर, विनायक कोळेकर, रामचंद्र कोळेकर यांची घरे असून यातील सुमारे चौदा लोक मातीच्या ढिगार्याखाली अडकली आहेत. घरांच्यावर सुमारे पंधरा फुटाहून अधिक मातीचा ढिगारा कोसळला आहे. तसेच या ठिकाणच्या जमिनीला मोठ्या भेगा पडल्या आहेत.
घटनास्थळी पोहोचण्यासाठी मोठे अडथळे असल्याने मदत कार्यात अडचणी येत आहेत. कराडहून NDRF ची टीम मदतीसाठी पोहोचली आहे.