सातारा | प्रतापगड येथे आज शिवप्रताप दिनाच्या कार्यक्रमात उत्पादन शुल्क मंत्री व बाळासाहेबांची शिवसेना गटाचे नेते शंभूराज देसाई यांनी उध्दव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले. पूर्वी लोक यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील यांची नाव घ्यायची अन् सांगत ते जागेवर निर्णय घेणारे मुख्यमंत्री होते. आता अतियोशक्ती होणार नाही, परंतु जागेवर निर्णय घेणारे आजचे मुख्यमंत्री आहेत. मागच्या सरकारच्या काळात आम्ही मंत्रीमंडळाच्या बैठका बघितल्या. तासाभरात मिटींग व्हायची, त्यात निम्मे विषय हे ऑनलाइनच व्हायचे, असा टोला पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी लगावला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पर्यंटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत आयोजित शिवप्रताप दिन सोहळ्यात मंत्री शंभूराज देसाई बोलत होते. ते म्हणाले, पूर्वीच्या सरकारच्या काळात मी मंत्री होतो, आताही मंत्री आहे. परंतु मुख्यमंत्र्याच्या कामाचा वेग कसा असावा. आज एक- एक मिटींग अडीच- अडीच तास चालते. त्यामध्ये 11 ते 12 विषय होतात आणि सकारात्मक निर्णय घेतत. त्यामुळे आज सामान्य लोकांच्या हिताचे निर्णय घेतले जात आहेत. लोकांसाठी वेळ दिला जात आहे.
गट- तट, राजकारण बाजूला ठेवा शंभूराज देसाई
सातारा जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वांनी आपले गट- तट, पक्षाचे राजकारण बाजूला ठेवूया. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पदाचा उपयोग जिल्ह्याच्या विकासासाठी करायचा आहे. जिल्ह्यात आज डोंगरी भागाचे तसेच दळणवळणाचे अनेक प्रश्न आहेत. जास्तीत- जास्त प्रश्न सोडविण्यासाठी व जिल्ह्याचा विकास साधण्यासाठी एकत्रित राहणे गरजेचे आहे. राजकारण करायचे तेव्हा करायचे, असेही मंत्री शंभूराज देसाई म्हणाले.