जावली । शिवसेना भवनाविषयी भाजप आमदार प्रसाद लाड यांनी वादग्रस्त वक्तव्य केले. त्यामुळे शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून लाड यांच्या या वक्तव्याबद्दल चांगलाच संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, शिवसेना नेते तथा गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी लाड यांच्या या वक्तव्याचा समाचार घेतला असून त्यांनी इशाराही दिला आहे.” शिवसेना भवनबद्दल लाड यांनी जी काही विधाने केली आहेत. त्यानंतर त्यांनी आपली विधाने मागे घेतली. जर त्यांनी घेतली नसती तर त्याचे परिणाम त्यांनी महाराष्ट्र्भर पहिले असते. मग त्यांचे शिवसेनाभवनकडे तिरक्या नजरेने बघण्याचे धाडसही झाले नसते, असे देसाई यांनी सांगितले.
यावेळी मंत्री देसाई म्हणाले की, “महाबळेश्वर तालुक्यातील नुकसानीबाबतीत पाहणी करून तेथील नुकसानीची माहितीही घेतली आहे. कोणत्याही परिस्थितीत या ठिकाणी प्रशासनाने दळणवळण सुरु करावे. दुर्गम व डोगराळ महाबळेश्वर तालुक्याच्या मदती करीता सरकार संवेदनशील असुन संवेदनशील मुख्यमंत्री सातारा जिल्ह्याची परिस्थितीबाबत विचारपुस करीत असतात. महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातुन नुकसानग्रस्त भागाला नक्कीच मदत केली जाणार आहेअसे सांगत गृहराज्यमंत्री देसाई यांनी याबाबत ठोस कृतीआरखडा लवकरात लवकर प्रशासनाने सादर करावा, अशा सूचना दिल्या.
महाबळेश्वर येथे नुकसानीबाबत गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांनी नुकसानाची व त्यासाठी शासनाकडून केल्या जात असलेल्या कामाची माहिती दिली. तसेच भाजप आमदार प्रसाद लाड यांनी केलेल्या वक्तव्याचा समाचारही घेतला. यावेळी शिवसेना जिल्हाअध्यक्ष यशवंत घाडगे, माजी शिवसेना जिल्हाध्यक्ष राजेश कुंभारदरे, शिवसेना नेते डी. एम. बावळेकर, युवासेना जिल्हा उपाध्यक्ष सचिन वागदरे, शिवसेना शहर प्रमुख राजु गुजर आदी उपस्थित होते.