विशेष प्रतिनिधी : काँग्रेसच्या पाठिंब्याने आता शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार हे आता स्पष्ट झालं आहे. मात्र, शिवसेनेकडून मुख्यमंत्रीपदावर कोण विराजमान होणार हे अजून गुलदस्त्यात असताना शरद पवार यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत सूचक वक्तव्य केलं आहे. त्यानुसार उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री व्हावं अशी इच्छा पवार यांनी व्यक्त केली आहे.
आतापर्यंत शिवसेनेकडून आदित्य ठाकरे यांचे नाव आधीपासून चर्चेत होते. परंतु राष्ट्रवादी आणि काँग्रेसने आदित्यच्या नावावर नापसंती दर्शवली आहे. तेव्हा आदित्य नाही तर मग कोण असा सवाल उपस्थित होत असताना एकनाथ शिंदे यांचे नाव सामोरं येत आहे. मात्र उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री होण्यास नकार दिला तरच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होऊ शकतील. तर सत्तास्थापनेचा दावा केल्यानंतर उद्धव यांनीच मुख्यमंत्री व्हावं अशी मागणी शिवसैनिक आता करत आहेत. असं झाल्यास उद्धव, ठाकरे घराण्याचे पहिले मुख्यमंत्री होणार.
तेव्हा नव्याने एकत्रित सत्ता स्थापन करणाऱ्या या महासेनाआघाडीत सरकारचा मुख्यमंत्री कोण होणार याबाबत उत्सुकता लागली आहे. तर दुसरीकडे या सरकारमध्ये एक मुख्यमंत्री तर दोन उपमुख्यमंत्री यांचा समावेश असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसला मिळू शकते.