हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. एकीकडे मनोज जरांगे पाटील हे ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी प्रयत्नशील आहेत तर दुसरीकडे ओबीसी आरक्षण वाचाव यासाठी लक्ष्मण हाके यांनी पुढाकार घेतला आहे. त्यातच आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनीही आरक्षण बचाव यात्रा सुरु केली आहे. या एकूण संपूर्ण प्रकरणांनी महाराष्ट्राचे वातावरण ढवळून निघालं आहे. या सर्व पार्श्वभूमीवर शरद पवारांनी (Sharad Pawar) मराठा आरक्षणावर तोडगा काढत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याना काही सूचना केल्यात.
प्रसारमाध्यमांशी बोलताना शरद पवार म्हणाले, मुख्यमंत्र्यांना मी त्यांना एकच गोष्ट सांगितली की या एकूण परिस्थितीची मला काळजी वाटते. त्यामुळ त्यातून मार्ग निघावा असं वाटतं, पण मला आज अडचण अशी दिसते की सरकारनं ज्या योग्य पद्धतीनं चर्चा करायला पाहिजे ती केलेली नाही. जरांगे यांच्यासोबत मुख्यमंत्री आणि त्यांचे अन्य नेते संवाद साधत आहेत मात्र दुसरीकडे जरांगेना विरोधक करणाऱ्या लोकांसोबत सरकार मधील दुसरे लोक सुसंवाद ठेवत आहेत. हे कशासाठी? कारण ओबीसींशी चर्चा करण्यासाठी सरकार छगन भुजबळांना सांगायचं दुसऱ्यांशी चर्चा करताना स्वतः करायची तर काहींना बाजुला ठेवायचं यामुळं कारण नसताना गैरसमज होतात असं म्हणत शरद पवारांनी सरकारची चूकच दाखवून दिली. तसेच याऐवजी सगळ्यांना विश्वासात घ्यावं आणि मार्ग काढावा असा सल्ला पवारांनी दिला.
आरक्षणाच्या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी आम्ही सूचवलं कि मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांना बोलवा. ओबीसी आरक्षणाचा आग्रह धरणारे भुजबळ आणि हाके तसेच त्यांच्या सहकाऱ्यांना बोलवा. आम्हालाही बोलवा. त्यावर आपण सामूहिक चर्चा करून मार्ग काढू. ज्यामुळं राज्यातील वातावरण सामाजिक ऐक्याच्या दृष्टीने अनुकुल आणि चांगलं राहिलं असं शरद पवार म्हणाले. आरक्षणाचा प्रश्न सुटावा हा आमचा प्रयत्न आहे. ज्या ज्या घटकांकडून मार्ग निघत असेल त्यांना सोबत घेऊन संवाद साधून मार्ग काढावा असा सल्ला शरद पवारांनी दिला.