हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या दसरा मेळाव्यावरून शिवसेना आणि शिंदे गटात राजकारण सुरु आहे. शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यावरून दोन्ही गटात रच्चीखेच सुरु आहे. याच संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एक मोठं विधान केलं आहे. दसरा मेळावा घेण्याचा अधिकार एकनाथ शिंदेनाही आहे, त्यासाठी त्यांना बीकेसी मैदानही देण्यात आलं आहे पण शिवाजी पार्क म्हणलं की शिवसेनाच असं मत शरद पवारांनी व्यक्त केलं आहे.
काहीही झालं तरी शिवसेनेचा दसरा मेळावा हा शिवाजी पार्कवरच होईल असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सातत्याने सांगत आहेत. मात्र अजूनही त्यांना तशी परवानगी देण्यात आलेली नाही. तर दुसरीकडे शिंदे गटाने बीकेसी मैदान आरक्षित केलं आहे. याच पार्श्वभूमीवर आज सोलापूर येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना शरद पवार म्हणाले, शिवसेना आणि शिवाजी पार्क हे एक समीकरण आहे. शिंदेनाही दसरा मेळावा घेण्याचा अधिकार आहे, पण त्यासाठी त्यांना बीकेसीचं मैदान देण्यात आलं आहे. मात्र शिवाजी पार्क म्हटलं की शिवसेनाच असं पवारांनी म्हंटल.
दरम्यान, दसरा मेळाव्यावरुन आता पुन्हा एकदा शिंदे गट आणि शिवसेनेत राजकारण तापण्याची शक्यता आहे. शिवाजी पार्कच्या मैदानासाठी शिवसेना आक्रमत झाली असल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेना शिवाजी पार्कसाठी थेट न्यायालयाची पायरी चढणार आहे. त्यामुळे आता दसरा मेळावा थेट कोर्टात जाणार असल्याची चर्चा रंगली आहे.