हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात गेल्या काही दिवसांपासून बारसू रिफायनरी मुद्यावरुन घमासान सुरु आहे. रिफायनरी प्रकल्पाच्या माती सर्वेक्षणाला स्थानिक नागरिकांनी विरोध केल्यानंतर राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये पुन्हा एकदा जुंपली आहे. याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रथमच भाष्य करत राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली आहे.
मंत्री उदय सामंत यांच्याबरोबर झालेल्या बैठकीनंतर शरद पवारांनी पत्रकार परिषदेत म्हंटल की, कोणताही प्रकल्प करताना स्थानिकांना विश्वासात घेणं गरजेचं असतं. त्यांचा विरोध असेल तर ते समजून घेत त्यातून मार्ग काढणं गरजेचं आहे. कोकणात काही नवीन होत असेल आणि स्थानिकांच्या तीव्र भावना असतील तर कोणत्याही सरकारने त्याची नोंद घेतली पाहिजे’. हीच राष्ट्रवादी काँग्रेसची भू्मिका आहे असे शरद पवारांनी स्पष्ट केलं.
ते पुढे म्हणाले, मी उदय सामंतांकडून बारसू रिफायनरीचा आढाला घेतला आहे. चर्चेतून मार्ग काढा असा सल्ला त्यांना दिला आहे. सध्या सुरु असलेलं मातीचे परिक्षणाचे काम थांबवा व विरोधक आणि शासकीय कर्मचाऱ्यांची बैठक घ्या अशी विनंती आपण उदय सामंत यांना केली असल्याचे शरद पवारांनी सांगितलं. त्यानुसार उद्याच यासंदर्भात बैठक घेतली जाईल, असे आश्वासन उदय सामंत यांनी दिल्याची प्रतिक्रिया पवारांनी दिली. उद्याच्या बैठकीत तोडगा निघतो का ते पाहू. या बैठकीनंतर अजूनही काही प्रश्न असतील आणि काही पर्याय असेल तर त्यावर चर्चा करू असेही पवारांनी सांगितलं.