हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| राजकिय वर्तुळातील नुकतीच एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची प्रकृती खालावली आहे. त्यामुळे पुढील चार दिवसांचे सर्व दौरे रद्द करावे लागले आहेत. पुण्यामध्ये असताना शरद पवार यांना अस्वस्थ वाटू लागल्यामुळे त्यांच्यावर त्वरित उपचार करण्यात आले. मात्र, अद्याप त्यांना नेमका कोणता त्रास होत आहे, याबाबत सांगण्यात आलेले नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, शरद पवार यांची तब्येत बिघडल्यामुळे पुढील चार दिवसांचे दौरे रद्द करण्यात आले आहेत. सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यापासून शरद पवार सातत्याने पक्षाच्या बांधणीसाठी कार्यरत आहेत. अशातच, त्यांच्या प्रकृतीकडे देखील दुर्लक्ष होत आहे. या सगळ्या धावपळीमुळेच शरद पवार यांची तब्येत बिघडली असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, शरद पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील अत्यंत अनुभवी आणि जनसंपर्कात कुशल नेते म्हणून ओळखले जातात. त्यांची तब्येत ठीक नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये चिंता पसरली आहे. सध्या पक्षातील ज्येष्ठ नेते आणि कार्यकर्ते त्यांच्या तब्येतीची विचारपूस करत आहेत. याबाबतच कोणतीही माहिती समोर आलेली नाही.