मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार पक्षातील लोकसभा लढवण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांचे हट्टपुरवताना चक्रव्यव्हात अडकले आहेत. एकिकडे राष्ट्रवादीचे सातारचे खासदार उदयनराजे भोसले यांनी पक्षाची अधिकृतपणे कोणतीही यादी जाहीर झाली नसून आपला मार्ग निवडायला आपण मोकळे आहोत असं वक्तव्य केल्याने संभ्रम निर्माण झाला आहे तर दुसरीकडे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव डॉ सुजय विखे पाटील यांनी आज मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश केला.
अहमदनगर आणि सातारा शहरातून आज खळबळजनक राजकीय खेळ्या पाहायला मिळाल्या आहेत. साताऱ्याचे विद्यमान खासदार उदयनराजे भोसले यांनी पक्षाची अधिकृतपणे कोणतीही यादी जाहीर झाली नसून आपला मार्ग निवडायला आपण मोकळे आहोत असं वक्तव्य करत भाजपच्या पदाधिकाऱ्यांची आज भेट घेतली. शेखर चरेगावकर यांच्याशी त्यांनी केलेली बोलणी राष्ट्रवादीच्या गोटात काळजी वाढवणारी ठरली. दरम्यान अहमदनगरमध्ये काँग्रेसचे खंदे कार्यकर्ते व विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव डॉ सुजय विखे पाटील यांनी आज मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश केला. अहमदनगरची लोकसभा जागा काँग्रेसला सोडावी यासाठी राधाकृष्ण विखे पाटील यांनी शरद पवार यांना गळ घातली होती परंतु त्या जागेबाबत अजूनही संभ्रम असल्याने सुजय यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचं निश्चित केलं.
उदयनराजेंना वडिलांसारखे आणि सुजय यांना आजोबांसारखे असलेले शरद पवार दोघांचेही बालहट्ट पुरवताना अडचणीत आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाची लोकसभा निवडणुकीसाठी आघाडी झाल्यानंतर जागावाटपाचे सर्वाधिकार राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना दिले गेले होते. परंतु माढा, मावळ, सातारा आणि अहमदनगर या चारही जागांच्या चक्रव्युव्हात अडकवण्याचं काम त्यांच्याच पक्षाचे नेते करत असल्यानं हा चक्रव्यूव्ह पवार कसा भेदणार हे पाहणं रंजक ठरणार आहे.