हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. यावेळी बिहार निवडणूक एकत्र लढण्यासंदर्भात दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती, सूत्रांकडून देण्यात आली आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी खासदार संजय राऊत आणि शरद पवार यांची बैठक झाली होती, त्यानंतर ही बैठक झाली. त्यामुळे या बैठकीला महत्व प्राप्त झाले आहे.पुन्हा एकदा बिहार निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र लढणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
बिहारमध्ये काँग्रेसने आधीच त्यांची आघाडी जाहीर केली आहे. तर मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा जदयु आणि भाजपचे जागा वाटप झालेले आहे. मायावतींच्या बसपाने असादुद्दीन ओविसी यांच्या एमआयएमसोबत ‘वंचित’ आघाडी उभारली आहे. शिवसेना यापूर्वीच एनडीएतून बाहेर पडली आहे. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला एकत्र येण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. पवार-ठाकरे भेटीत यावर चर्चा झाल्याचे एका नेत्याने सांगितले.
आधी शिवसेना व नंतर राष्ट्रवादीनेही बिहारमध्ये निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही पक्षांनी आपल्या स्टार प्रचारकांची यादीही निवडणूक आयोगाकडे पाठविली आहे. दोन्ही पक्षांच्या यादीनुसार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत, सुप्रिया सुळे यांच्यासह सुमारे ६० नेते बिहारमध्ये प्रचारासाठी जातील.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’