पवारांनी 50 वर्षानंतर काकडे कुटुंबीयांची घेतलेली भेट बारामतीचे राजकारण बदलणार??

Sharad Pawar Kakde
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बारामती म्हटलं की पवार आणि पवार म्हटलं की बारामती. पण ज्या बारामतीला पवारांच्या राजकारणानं देशभर नाव मिळालं ती बारामती कधीकाळी काकडेंचं सत्ताकेंद्र होती. काकडेंचा शब्द इथल्या राजकारणात अंतिम समजला जायचा. पण याच काकडेंच्या वर्चस्वाला धक्का देत शरद पवारांचं राजकारण सुरु झालं. हळूहळू काकडेंच्या शिक्षण संस्था, कारखाने, सहकारी संस्था ताब्यात घेऊन काकडेंचं राजकारण शून्यात नेऊन ठेवलं. यानंतर काकडेंचा पवार विरोध आणखीनच तिखट झाला. पुऱ्या तालुक्यात पवारांना भिडण्याची कुणाची ताकद असेल तर ती काकडेंचीच, असं उघड उघड बोललं जाऊ लागलं. मात्र तब्बल ५० वर्षांचं हे वैर संपलंय आणि त्याला पुढाकार घेतलाय तो पवारांनीच. बारामतीत नणंद विरुद्ध भावजयी अशी टोकाची लढत असताना सुप्रिया सुळेंंना दादांनी कडवं आव्हान उभं केलंय. वयाच्या ८४ पार झालेल्या कडव्या पवारांनी मात्र काहीही झालं तरी आपली मुलगी पुन्हा खासदार झालीच पाहीजे, यासाठी त्यांनी बेरजेच्या राजकारणावर भर दिलाय. आधी थोपटे, तावरे यांच्यासोबतचे बिघडलेले संबंध जुळवण्याासाठी प्रयत्न करणाऱ्या पवारांनी ५० वर्षांचं वैर विसरुन काकडेंच्या निंबुत या गावात पाऊल ठेवलं. आणि एक वर्तुळ पूर्ण झालं. येणाऱ्या लोकसभेसाठी सुप्रियाताईंना दादांनी कोंडीत पकडलेलं असताना ताईंच्या मागे काकडेंची ताकद जोडणं पवारांना महत्वाचं का वाटलं? कधीच बोललं न गेलेल्या या पवार – काकडे घराण्याचं वैर कुठून आणि का सुरु झालं? काकडे खरंच सुप्रियाताईंच्या झोळीत निर्णायक मत टाकू शकतात का? याबाबत जाणून घेऊयात…

भोरचे माजी आमदार अनंतराव थोपटे यांच्याबरोबर असलेले शत्रुत्त्व विसरून शरद पवारांनी तब्बल २५ वर्षांनी भेट घेतल्यानंतर बारामतीतील पवारांचे पारंपरिक विरोधक असलेल्या काकडे कुटुंबीयांची तब्बल ५५ वर्षांनी भेट घेऊन राजकारणातील विरोधाला तिलांजली दिली. दिवंगत खासदार संभाजी काकडे यांच्या पत्नी कंठावती काकडे यांचं नुकतंच निधन झाल्यानंतर पवार हे काकडेंच्या घरी सांत्वनासाठी गेले. निवडणुकीच्या तोंडावर ही भेट झाल्यानं या भेटीला राजकारणाशी जोडणं स्वाभाविक होतं. पवारांचा बारामतीच्या राजकारणात राजकीय उदय होण्याच्या आधीची ही गोष्ट. तेव्हा बारामती आणि पुणे जिल्ह्याच्या राजकराणावर काकडेंंचं वर्चस्व होतं. बारामतीच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि सहकाराच्या नाड्या काकडेंच्या ताब्यात होत्या. या सगळ्या कामाची पहिली वीट रचली ती साहेबराव काकडे यांनी. साहेबराव काकडेंनी १९११ साली सहकारी सोसायट्या स्थापन करुन सहकाराची पाळंमुळं बारामतीत घट्ट रोऊन दिली. यानंतर राजकारणात आलेल्या त्यांच्या दोन सुपुत्रांनी सहकाराचं भलंमोठं जाळं निरा – बारामती पट्ट्यात उभारलं. ह्या जोडगोळीचं नाव होतं मुगुटराव काकडे आणि त्यांचे धाकटे बंधू बाबालाल काकडे. सोसायट्या संघ, खरेदी विक्री संघ, जिल्हा बँका या काकडे कुटुंबाच्या ताब्यात होत्या. काकडेंना विश्वासात घेतल्याशिवाय जिल्ह्याच्या राजकारणाील पानही हालत नव्हतं. मुगुटराव काकडे यांनी सहकाऱ्यांना घेऊन १९६३ ला सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची स्थापना केली आणि काकडे गट राज्याच्या राजकारणात मोठा झाला. त्याकाळी साखर कारखाना म्हणजे मोठे साम्राज्य होते. त्यांनी सहकारी सोसायट्या, उपसा सिंचन योजना, बंधारे उभारायला सहकार्य केले. त्यामुळे पवार गटासाठी काकडे गटाचे प्रकरण सुरवातीला तसे जडच होते.

अशा राजकारणातल्याा मातब्बर काकडे घराण्यासोबत पवारांचा पहिला राजकीय संघर्ष झाला तो १९५५ ला. कारण ठरलं निरा कॅनोल सोसायटीच्या निवडणुकांचं… शरद पवारांचे वडिल गोविंदराव पवार आणि बाबालाल काकडे यांच्यात ही लढत झाली. या संघाचे अध्यक्ष-सेक्रेटरी असलेल्या गोविंदराव पवारांचा काकडेंनी पराभव केला. यानंतर १९६७ च्या निवडणुकीत खऱ्या वादाला तोंड फुटलं. काँग्रेस कार्यकर्ते आणि नेत्यांचा आग्रह हा बारामतीतून तिकीट काकडेंना सुटलं पाहीजे यासाठी होता. मात्र यशवंतराव चव्हाण यांनी पवारांच्या पारड्यात वजन टाकलं आणि विधानसभेचं तिकीट शरद पवारांना मिळालं. पवारांच्या राजकीय कारकिर्दीतील ही पहिलीच निवडणूक. काँग्रेसच्या तिकीटावर पवार उभे राहिले आणि नाराज झालेल्या काकडे आणि समर्थक नेत्यांनी काँग्रेसचा राजिनामा दिला. शेकापनंही बाबालाल काकडे यांना पाठिंबा जाहीर केला. या निवडणुकीत पवारांना ३५ हजार तर काकडेंना १७ हजार इतकी मतं मिळाली. यानंतरच्या निवडणुकीत पवारांचं लीड वाढत गेलं आणि काकडेंचं राजकारण मागे पडलं…

त्यानंतर अठरा वर्षांनी १९८५ साली पवार-काकडे संघर्ष जोरदार झाला. त्या निवडणुकीत पवारांनी काॅंग्रेसची साथ सोडून स्वतःचा समाजवादी काॅंग्रेस हा पक्ष स्थापन केला होता. शरद पवार यांच्या विरोधात शहाजी काकडे यांना इंदिरा काँग्रेसची उमेदवारी मिळाली. वसंतदादा पाटील यांनी काकडे गटाला सर्व ताकद पुरविली. वसंतदादा पाटलांनीच शहाजी काकडे यांना बोलवून उमेदवारी दिली होती. पवारांच्या निवडणुकांतील ती एक संघर्षपूर्ण निवडणूक ठरली. मात्र यावेळीही १८ हजार मतांनी काकडे गटाचा पराभव झाला. त्यापुढील काळात मात्र पवार केंद्रात गेले. देशातल्या पहिल्या फळीचे नेते बनले. त्यांना निवडणुकांना विरोधच उरला नाही.

काकडे यांच्या कुटुंबातील संभाजीराव काकडे हे पण दुसरीकडे पवारांना राज्य पातळीवर आव्हान देण्याचा अधुनमधुन प्रयत्न करत होते. कधी जनता पक्ष तर कधी जनता दल या मार्फत ते पवार विरोधकांची एकी बांधण्याचा अधुनमधुन प्रयत्न करत होते. त्यामुळे शरद पवार-संभाजीराव काकडे यांच्या संबंधातही चढ-उतार राहिला. समाजवादी असलेले संभाजीराव काकडे हे विधान परिषदेला आमदार, दोन वेळा खासदार होते. आणीबाणीच्या काळात तुरुंगवासही भोगला. शरद पवारांनी पुलोदची आघाडी केली. मात्र त्या वेळी इतर समाजवादी पक्षाचा पाठींबा मिळविण्यासाठी व पवारांना मुख्यमंत्री करण्यासाठी संभाजीराव काकडे यांनी वाटा उचलला होता.

मात्र या सगळ्यात काकडेंना राजकारणात एक गोष्ट जिवंत ठेवू होती. ती म्हणजे सोमेश्वर सहकारी साखर कारखाना. १९९२ पर्यंत शरद पवार गटाला काकडेंचा हा कारखाना काही केल्या मिळवता आला नव्हता. संपूर्ण तालुक्यावर पवारांचा एकाधिकार चालत असताना काकडे मात्र पवारांना जड जात होते. शरद पवार राज्याचे मुख्यमंत्री असतानाही सोमेश्वर कारखाना आपल्या ताब्यात घेण्याचंं त्यांचं स्वप्न स्वप्नच राहीलं. यावरुन काकडेंचा विरोध हा किती कडवा होता, याचा आपल्याला अंदाज बांधता येईल. यानंतर अजितदादा राजकारणात सक्रीय झाले आणि त्यांनी पहिलं काम केलंं ते काकडे गटाला सुरुंग लावणयाचं. काकडेंचा एकेक माणूस फोडत पवारांनी शेवट सोमेश्वर कारखाना हा ताब्यात घेतलाच. काकडेंच्या हातातील एकेक संस्था निसटत गेल्या. आणि बारामतीच्या राजकारणातील काकडेंचं वर्चस्व संपुष्टात आलं. पण असं असलं तरी काकडे आणि पवारांचं शीतयुतद्ध निरा – बारामती पट्ट्यात कायम राहीलं. अजित पवारांच्या राजकारणाला शह देण्याचा प्रयत्न काकडेंकडून चालूच होता. काकडेंशी असणारं हे वैर भविष्यात त्रासदायक ठरु शकतं, हे पवारांना पक्कं ठाऊक होतं. त्यामुळे मधल्या काळात अजितदादांनी काकडेंना जवळ केलं. शेतकरी कृती समितीचे नेते सतीश काकडे यांचे चिरंजीव अभिजीत काकडे यांना त्यांनी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदावर संधी दिली.आणि यानंतर काकडेंचा विरोध काही प्रमाणत मावळला.

अजित पवार यांचा लोकलचा कनेक्ट असल्याने राष्ट्रवादीत फुटीच्या आधी काकडेंशी थेट संबंध हा अजितदादांचा येत होता. मात्र शरद पवार यांनी कधी काकडेंचं वैर संपण्यासाठी विशेष प्रयत्न केले नव्हते. मात्र कधी नव्हे तो बारामतीच्या इतिहासात पवारांच्याच घरात फूट पडून नणंद विरुद्ध भावजयी संघर्ष सुरु झाला. लोकसभेला काहीही झालं तरी सुनेत्राताईंना निवडून आणण्यासाठी अजितदादांनी आपली सगळी यंत्रणा कामाला लावलीय. अशावेळेस शरद पवारांनी हा बेरजेच्या राजकारणावर भर दिलाय. जिथून राजकारणाचा श्रीगणेशा करत ज्या काकडे गटासोबत वैर पत्करलं त्याच काकडेंची भेट घेत पवारांनी एक मोठं वर्तुळ पूर्ण केलं. ही भेट वेगळ्या कारणाने असली तरी काकडेंचा हा गट जुनंं वैर विसरुन आपल्या पाठिशी उभआ राहिला तर सुप्रियाताईंना बारामती पटट्यातून मोठी ताकद मिळू शकते, हे पवारांना पक्कं ठावूक आहे. त्यामुळे आता काकडे नेमकी कुणाला रसद पुरवतात यावर बारामतीचं बरंच गणित अवलंबून असणार आहे.