सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खा. शरद पवार हे सोमवार दि. 27 डिसेंबर रोजी सातारा दौऱ्यावर येत आहेत. रयत शिक्षण संस्थेच्या विविध कार्यक्रमांना उपस्थित राहून शासकीय विश्रामगृहावर पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी ते संवाद साधणार आहेत.
खा. शरद पवार यांचे सोमवारी सकाळी 10.30 वाजता सैनिक स्कूल सातारा येथे हेलिकॉप्टरने आगमन होणार आहे. सकाळी 11 वाजता रयतशिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी महाविद्यालयात रामशेठ ठाकूर भवन या इमारतीचा व नूतनीकरण केलेल्या प्रशासकीय कार्यालयाचा शुभारंभ खा. पवार यांच्या हस्ते व संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील, व्हा. चेअरमन अॅड. भगीरथ शिंदे, गृहमंत्री ना. दिलीप वळसे-पाटील, संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य रामशेठ ठाकूर व सचिव डॉ. विठ्ठल शिवणकर यांच्या उपस्थितीत होणार आहे. या कार्यक्रमानंतर खा. शरद पवार हे 12.30 ते 1.15 यावेळेत शासकीय विश्रामगृह येथे थांबणार आहेत. दरम्यान ते पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.
दुपारी कोरेगाव तालुक्यातील करंजखोप येथे खा. पवार हे जाणार आहेत. दुपारी 2 ते 3. 30 यावेळेत रयत शिक्षण संस्थेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर ते सोळशी ता. कोरेगावकडे प्रयाण करणार आहेत. सोळशी येथे मुंबई कृषि उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन बाळासाहेब सोळसकर यांच्या निवासस्थानी थांबून नंतर ते 4.15 वाजता हेलिकॉप्टरने मुंबईकडे प्रयाण करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील | यांनी दिली.