हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । साताऱ्यातील वनकुसवडे हे थंड हवेचं ठिकाण पवन ऊर्जेच्या भल्या मोठ्या पंख्यामुळे देखील प्रसिद्ध आहे. पण वनकुसवडे किंवा साताऱ्यातील अनेक भागात या पवनऊर्जेच्या निर्मितीला (windmills) प्रचंड प्रमाणावर चालना का मिळाली ? किंवा ही सुरवात याच भागातून का झाली ? याची खूप इंटरेस्टिंग स्टोरी शरद पवारांच्या “लोकं माझे सांगाती” या राजकीय आत्मकथनात आलीय.
लवासा का ? या प्रकरणात ते म्हणतात, “नेहमी चौकटीबाहेरचा विचार मनात भिनत ठेवला तर विकासाची दालनं खुली होतात यावर माझा विश्वास आणि शिवाय अनुभवही आहे. राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची सूत्रं ज्यावेळी मी दुसऱ्यांदा स्वीकारलेली त्यावेळी माझा सातारा जिल्ह्यात दौरा होता. या जिल्ह्यात पाटण इथे आमचे एक सहकारी विक्रमसिंह पाटणकर असतात. ही पाटणकर मंडळी म्हणजे या भागातलं मोठं प्रस्थ. इथले लोक त्यांना ‘सरकार’ संबोधतात. त्यांचं कोयनेच्या परिसरातलं गाव मोठं रमणीय आहे. पाटण भागात गेलो की त्यांच्याकडेच मुक्कामाला असतो. अशा मुक्कामांत विक्रमसिंह पाटणकरांच्या काकांशी फार मस्त गप्पा व्हायच्या. हे काका अवलिया वर्गातलेच होते. तसचं त्यांचं पक्षीप्रेम हे प्रचंड थक्क करणारं होतं. एका प्रचंड मोठ्या पिंजऱ्यात त्यांच्याकडे दीड-दोन हजार वेगवेगळे पक्षी होते. या पक्ष्यांशी ते संवाद साधायचे. पक्षीही त्यांना बिलगत. असो. तर त्यांच्या निवासस्थानी जाऊन रात्री गप्पाटप्पा करणं, हा माझा एक आवडीचा भाग होता.
मी असंच एकदा साताऱ्याच्या दौऱ्यावर गेलो असताना विक्रमसिंह पाटणकर यांच्या गावी मुक्कामाला गेलो. त्यांच्या निवासस्थानापासून समोर दिसणारा डोंगर पाहून मी विक्रमसिहांना विचारलं, “या डोंगरावर काय आहे? ते म्हणाले, “काही नाही. पण तो डोंगर मात्र आमच्या मालकीचा आहे. आम्ही तिथे येणारी फळं, लाकूडफाटा डोंगरात राहणाऱ्यांना घेण्याची मुभा दिली आहे.”मी म्हणालो, “मला त्या डोंगराच्या शिखरावर जायचं आहे.” ते म्हणाले, “ठीक आहे. उद्या जाऊ” मी माझ्या हेलिकॉप्टरच्या चालकाला म्हणालो, “आपल्याला समोरच्या डोंगरावर जायचं आहे. सकाळी लवकर उठून तुम्ही एक चक्कर मारून हेलिकॉप्टर उतरण्याची जागा शोधून ठेवा. ठरल्यानुसार विक्रमसिंह आणि मी हेलिकॉप्टरनं डोंगरावर गेलो. तिथे वारा एवढा जबरदस्त होता की आमचं हेलिकॉप्टरही हेलकावे खात होतं. आम्ही उतरलो. उत्तरल्यावरही त्या भन्नाट वाऱ्याचा वेग लक्षात घेता मी विक्रमसिंहांना म्हणालो,”इथल्या व्हेलॉसिटीचा अभ्यास करून घ्यायला पाहिजे. इथे पवनचक्की उभारता येईल. तुम्हीच का नाही यासाठी पुढाकार घेत ? विक्रमसिंहांनी ते तात्काळ मान्य केलं.
जर्मनीमध्ये व्हेलॉसिटीचा अभ्यास करणाऱ्या संस्था आहेत. या संस्थांनी शास्त्रीय पाहणी करून त्यांच्या अहवालात पवनचक्क्यांसाठी ही जागा योग्य असल्याचं नमूद केलं. मग विक्रमसिहांनीच तिथे दोन कोटी रुपयांत चार पवनचक्क्या उभ्या केल्या. त्यातून एक मेगावॅट वीज मिळू लागली. त्या वेळी एक मेगावॅट वीजनिर्मितीचा खर्च चार कोटी रुपये होता. वीजनिर्मितीच्या खर्चात निम्म्यानं बचत होऊन ‘क्लीन एनर्जी निर्माण होऊ शकते, हे या निमित्तानं लक्षात आलं.
पण हाही प्रयोग सुखासुखी स्वीकारला गेला नाही. त्याला राजकीय कंगोरेही होतेच. ‘पवनचक्क्यांच्या पंख्यांमुळे ढग विखुरले जाऊन पाऊस निघून जातो!’ असा हाकारा शालिनीताई पाटलांनी दिला. गेल्या दहा वर्षात तिथला पाऊस इंचभरही कमी झालेला नाही. मुंबईमध्ये लोकप्रतिनिधी जेव्हा आपआपसात पाऊसपाण्याची चर्चा करीत असतात; तेव्हा विक्रमसिंह पाटणकर गावाकडे फोन करून आज वारा कसा आहे, अशी चौकशी करत, हे मोठं मनोरंजक आहे.
त्याच दरम्यान एकदा मी गुजरातच्या दौऱ्यावर होतो. तिथे एक कुटुंब माझ्या मैत्रीतलं होतं. त्यांच्याकडे पैसे होते आणि त्यांना ते कुठेतरी गुंतवण्यात रस होता. आमच्या गप्पांत त्यांनी मला पैसे कुठे गुंतवता येतील असं विचारलं. पवनचक्कीचा प्रयोग नुकताच आम्ही यशस्वी केला होता. मी त्यांना ‘या व्यवसायात का गुंतवणूक करीत नाही?’ असं विचारलं. त्यांनी ते मान्य केलं. त्यांना पुण्यात व्यवसायासाठी जागा उपलब्ध करून दिली. त्यांनी पाटण,पाचगणी परिसरात दोनशे पवनचक्क्या उभारल्या. तेवढंच करून ते थांबले नाहीत. महाराष्ट्रात आणि देशातही पवनचक्क्या उभारण्यासाठीच्या जागा शोधून त्यांनी व्यवसाय विस्तार केला. आज पवनऊर्जा निर्माण करणारी जगातली दुसऱ्या क्रमांकाची कंपनी त्यांची आहे- ‘सुझलॉन’! आणि या व्यवसायात उतरणारे कंपनीचे मालक म्हणजे तुलसी तांती.