पुणे । महाविकास आघाडी सरकारमध्ये अस्वस्थता, नाराजी वगैरे काहीही नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चांगलं काम करताहेत. तिन्ही पक्षांमध्ये उत्तम समन्वय आहे’, असे नमूद करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज महाविकास आघाडीत सर्व काही आलबेल असल्याचे सांगितले. शरद पवार यांची आज पुण्यात व्यापारी महासंघाच्या प्रतिनिधींसोबत बैठक झाली. या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत पवार यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना दिलखुलासपणे उत्तरे दिली.
महाविकास आघाडी सरकारमध्ये अंतर्विरोध असल्याच्या प्रश्नावर शरद पवार यांनी यावेळी स्पष्टीकरण दिलं. महाविकास आघाडीत अस्वस्थता आहे, नाराजी आहे, हे सगळं तुमचं म्हणणं आहे. तुम्ही माझ्या ज्ञानात भर घातली त्यासाठी धन्यवाद, असा माध्यमांना चिमटा काढत महाविकास आघाडीत एकवाक्यता असल्याचे पवार यांनी ठामपणे सांगितले. राज्यात विविध प्रश्न आहेत. त्याबाबत मी सातत्याने मुख्यमंत्र्यांशी बोलत असतो. कालची बैठकही तशीच होती, असे पवार यांनी नमूद केले. पोलिसांच्या बदल्यांवरून वाद असल्याचे जे म्हटले जात आहे त्यात जराही तथ्य नाही, असेही पवार यांनी स्पष्ट केले. आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या या मुख्यमंत्र्यांच्या सहमतीनेच केल्या जातात, असेही पवार यांनी सांगितले.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या कामावर आपण समाधानी आहात का, असे विचारले असता, जे दिसतंय ते निश्चितच समाधानकारक आहे. मुख्यमंत्र्यांनी सत्ता हातात घेतल्यानंतर गतीने पावले टाकण्यासाठी अनेक योजना आखल्या होत्या मात्र कोरोनामुळे सगळ्याच प्रायोरिटी बदलल्या आहेत. सर्व कामे थांबवावी लागली आहेत. करोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे. दररोज प्रमुख मंडळी १४-१५ तास काम करीत आहे. मी हे सारं जवळून पाहतोय, असेही पवार म्हणाले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”