मुंबई प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर राज्य सहकारी बँकेच्या २५ हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप ठेवून गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या संदर्भात माहिती देण्यासाठी आपण ईडीच्या कार्यालयात जाणार आहे असे शरद पवार स्वतः म्हणाले होते. त्यानंतर ते आज जाणार देखील होते. मात्र कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नामुळे त्यांनी ईडीच्या कार्यालयात जाणे टाळले त्यानंतर त्यांनी माध्यमात आपली प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई शहराचे पोलीस आयुक्त आपल्याकडे आले त्यांनी मला ईडीच्या कार्यालयात जाऊ नका अशी विनंती केली त्यानंतर परिस्थितीचे गांभीर्य पाहता मी ईडीच्या कार्यलयात जाणे टाळले असे शरद पवार म्हणाले आहेत. ईडीने देखील आपल्याशी इमेल द्वारे संवाद साधला असल्याचे शरद पवार यांनी म्हणले आहे. आपण ईडीच्या कार्यालयात येऊ नये. आवश्यकता भासल्यास आम्ही आपणास बोलावून घेऊ असे देखील ईडीच्या वतीने शरद पवारांना सांगण्यात आले आहे.
दरम्यान माध्यमांशी संवाद साधताना शरद पवारांनी महाराष्ट्रातून मिळत असलेल्या पाठिंब्या बद्दल जनतेचे आभार मानले आहेत. राहुल गांधी आणि माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांचा आपल्याला फोन आला होता. त्यांनी देखील आपण तुमच्या सोबत असल्याचे म्हणले आहे असे शरद पवार म्हणाले आहेत. तसेच शिवसेनेने देखील आपल्याला पाठिंबा दिला त्याबद्दल शिवसेनेचे देखील आपण आभार मानतो असे शरद पवार म्हणाले आहेत.