हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो कंपनीवर शुक्रवारी प्रदूषण मंडळाने कारवाई केली आहे. या ॲग्रो कंपनीचे येत्या ७२ तासांत दोन्ही प्लांट बंद करा, अशी नोटीस प्रदूषण मंडळांने दिली आहे. या कारवाईवर आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बारामतीतील गोविंद बाग या निवासस्थानी आज शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी, या प्रकरणावर मी उत्तर देणार नाही, असे म्हणले आहे. थोडक्यात, शरद पवार यांनी या कारवाईवर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.
आज माध्यमाची संवाद साधताना शरद पवार यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य केलं. यावेळी ते म्हणाले की, “आरक्षण देताना ज्यांना आरक्षण मिळतं त्यांच्यातील वाटा दुसऱ्यांनी घेऊ नये, अशी अपेक्षा ओबीसींची आहे. त्याची नोंद सरकारला घ्यावी लागेल. राज्य सरकार याबाबत काय निर्णय घेईल, हे येत्या 30-35 दिवसांत कळेल” यानंतर शरद पवार यांनी केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर घातलेल्या बंदीवर देखील आपली भूमिका मांडली.
कांदा निर्यातीवर घालण्यात आलेल्या बंदीवर बोलताना शरद पवार यांनी म्हटले की, “केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर 40% एक्साईज ड्युटी लावली आहे. बांगलादेशात भारताचा सगळ्यात जास्त कांदा जातो. नाशिक धुळे पुणे जिल्ह्याचा काही भाग आणि साताऱ्याचा काही भागातील कांदा देशातील आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत जातो. याला केंद्र सरकारने बंधने घातले आहेत. कांदा हे जिरायत शेतकऱ्याचे पीक आहे, यामुळे याच्यावर बंधन घालणं चुकीचं आहे”
दरम्यान, सध्या सरकारला कोणत्या ना कोणत्या कारणावरून धारेवर धरणाऱ्या रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो कंपनीला नोटीस बनवण्यात आली आहे. रोहित पवार यांना रात्री 2 वाजता नोटीस ही नोटीस बजावण्यात आली. यामध्ये ॲग्रो कंपनीचे दोन प्लांट 72 तासांत बंद करण्याची सूचना देण्यात आली आहे. याबाबतची माहिती स्वतः रोहित पवार यांनी ट्विट करून दिली होती.