हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण (Maratha Aarakshan) मिळावे हि मागणी घेऊन मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा ७ वा दिवस असून त्यांची प्रकृती खालावली आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापलं असून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप करत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मराठा आरक्षणाबद्दल एक मोठं विधान केलं आहे. मनोज जरांगेंची मागणी योग्यच आहे असं म्हणत पवारांनी मराठा आरक्षणाला जाहीर पाठिंबा दिला आहे.
शरद पवार कोकणच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी रत्नागिरी येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी मराठा आरक्षणावर मत मांडलं. आमच्या पक्षाची भूमिका नेहमी हीच आहे कि आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे. मात्र हा पाठिंबा देत असताना इतर जे लहान घटक आहेत त्यांनाही बरोबर घेण्याची भूमिका घ्यावी लागेल. मराठा समाज आरक्षण मागत आहे त्यात काही चुकीचे नाही. मराठा समाजाचे वैशिष्ट हे आहे कि हा समाज इतर सर्व जाती- धर्माना सोबत घेणारा समाज आहे. शिवछत्रपतींनी १८ पगड जातीच्या जनतेला सोबत घेऊन रयतेचं राज्य निर्माण केलं, तीच भूमिका आज आहे. त्यामुळे मराठा समाजाच्या आरक्षणाची भूमिका हि योग्य आहे, पण हे करत असताना इतर समाजाचा सुद्धा विचार करावा अशी भूमिका जरांगे पाटलांनी मांडल्याचे शरद पवारांनी सांगितलं. हाच आमचाही आग्रह असल्याचे शरद पवार यांनी म्हंटल.
यावेळी शरद पवार याना महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री कोण असेल असा सवाल केला असता त्यांनी १९७७ च्या राजकारणाचे उदाहरण दिले. विधानसभा निवडणुकीत आम्ही निवडून आलो तर एकत्र बसून निर्णय घेऊ आणि एक सक्षम नेता राज्याला देऊ असं म्हणत शरद पवारांनी १९७७ सालचं उदाहरण दिले. १९७७ साली आणीबाणीनंतर देशात निवडणुका झाल्या. जयप्रकाश नारायण यांच्या सूचनेने समविचारी पक्ष एकत्र आले आणि निवडणुकीला सामोरे गेले. लोकांनी त्यांना निवडून दिलं आणि मोरारजी देसाई यांची पंतप्रधानपदी निवड करण्यात आली. आम्ही जेव्हा लोकांकडे मतं मागितली तेव्हा मोरारजी देसाई हे आमचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नव्हते. आम्ही कधीही लोकांना सांगितलं नव्हतं की अमुक नेता आमचा पंतप्रधानपदाचा चेहरा असेल. तरीदेखील लोकांनी आम्हाला शक्ती दिली आणि मोरारजी देसाई पंतप्रधान झाले. त्यांनी देश चालवला. असा अनुभव पवारांनी सांगितला.