महाराष्ट्र पिंजून काढणार, पक्ष फोडणाऱ्यांना जागा दाखवणार; कराडातून शरद पवारांचा एल्गार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अजित पवार यांनी आपल्या समर्थक आमदारांसह राष्ट्रवादी काँग्रेस मधून बंडखोरी केल्यानंतर आज दुसऱ्याच दिवशी शरद पवार ऍक्शन मोडमध्ये आले आहेत. ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला त्यांना त्यांची जागा दाखवणार असा स्पष्ट इशारा शरद पवारांनी बंडखोर आमदारांना दिला आहे. आज गुरुपौर्णिमेनिमित्त शरद पवार यांनी कराड येथे जाऊन यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन केलं.त्यानंतर परिसरातील वडाच्या झाडाखाली असलेल्या पारावर उभं राहुन कार्यकर्त्यांना संबोधित करताना शरद पवारांनी भाजपसह राष्ट्रवादीच्या बंडखोरांवर निशाणा साधला.

शरद पवार म्हणाले, यशवंतराव चव्हाण यांनी राज्यामध्ये नवी पिढी तयार केली. प्रत्येक जिल्ह्यात युवकांचा संच निर्माण केला. त्या माध्यमातून महाराष्ट्राचा विकास केला. आता सामान्य माणसांचा लोकशाहीचा अधिकार जपला पाहिजे. काही जणांकडून समाजात भीती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. देशभरातील विरोधी पक्षांची सरकारे पाडण्याचा प्रयत्न सुरु आहे. फोडाफोडीच्या भाजपच्या या प्रवृत्तीला आपल्यातील काही लोक बळी पडली. परंतु मी आता संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत जनतेच्या न्यायालयात जाणार आहे. ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला त्यांना त्यांची जागा दाखवणार असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.

Sharad Pawar Live : कराड येथून करणार मोठी घोषणा?

 

दरम्यान, कराड येथे शरद पवार यांच्या स्वागताला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी करत आपला पाठिंबा दर्शवला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार श्रीनिवास पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार शशिकांत शिंदे, सारंग पाटील, आर आर पाटील यांच्या पत्नी सुमन पाटील आणि सुपुत्र रोहित पाटील हे मान्यवर उपस्थित होते. प्रीतिसंगम परिसरात संपूर्ण वातावरण हे राष्ट्रवादीमय झाल्याचे पाहायला मिळालं.