हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या राज्यातील अनेक भागांमध्ये परतीच्या पावसाने अक्षरश: थैमान घातले आहे. त्यामुळे शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. शेतकऱ्यांचे हातातोंडाशी आलेले सोन्यासारखे पीक मातीमोल झाले आहे. शेतकऱ्यांवर खूप मोठं संकट आले असून शेतकऱ्यांना धीर देण्याची गरज आहे. मध्य महाराष्ट्र कोकण आणि मराठवाडय़ात परतीच्या पावसामुळे पिकांचं खूप मोठय़ा प्रमाणावर नुकसान झालं आहे. पावसामुळे हातचं पीक गेल्याने बळीराजा अडचणीत सापडला आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार नुकसानीचा आढावा घेण्यासाठी मराठवाडा दौऱ्यावर जाणार आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, ते मराठवाड्यातील उस्मानाबाद आणि लातूर या भागांचा दौरा करणार आहेत. यावेळी ते अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीचा आढावा घेतील. 18 ते 19 ऑक्टोबर या दोन दिवसांत शरद पवार मराठवाड्यात असतील. ते तुळजापूर, उमरगा,औसा, परंडा ,उस्मानाबादमधील भागांना भेटी देतील, अशी माहिती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी दिली.
“राज्यात काही दिवसांसाठी पुन्हा अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे गाफील राहू नका. प्राणहानी होऊ नये यासाठी नागरिकांना विश्वासात घेऊन स्थलांतराचे काम करा,” असं सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी राज्यातील प्रशासकीय यंत्रणेला अतिवृष्टी व पूरस्थितीत सतर्क राहून काम करण्याचे निर्देश दिले. बाधितांना तातडीने मदत द्या तसेच झालेल्या नुकसानाचे वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याच्या सूचनाही त्यांनी प्रशासनास दिल्या.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’