कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कराड तालुक्यातील गोंदी गावचे सुपुत्र व दापोली (जि. रत्नागिरी) येथे उपविभागीय अधिकारी पदावर कार्यरत असणाऱ्या शरद भगवान पवार यांना तेथील जिल्हाधिकाऱ्यांनी उत्कृष्ठ कार्य केल्याबद्दल गौरविले आहे. श्री. पवार यांचे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण येथील छत्रपती संभाजी विद्यालय व कृष्णा महाविद्यालयात झाले आहे.
शरद पवार यांनी कोल्हापूरच्या कृषी महाविद्यालयात कृषी पदवी संपादन केलेली आहे. त्यानंतर आशिया खंडात नामांकित असलेल्या उत्तराखंड येथील गोविंद वल्लभपंत कृषी विद्यापीठातून कृषी शिक्षणातील पदवीत्तुर शिक्षण घेवून बागलकोट येथील सूर्यफूल व कापूस संशोधन केंद्रात संशोधक म्हणून त्यांनी काम पाहिले. त्यानंतर ठाणे तालुका कृषी अधिकारी म्हणून कार्यरत होते. याचवेळी त्यांनी स्पर्धा परिक्षेचे प्रयत्न केले. व पहिल्याच प्रयत्नात उपजिल्हाधिकारी परिक्षा उत्तीर्ण झाले.
स्पर्धा परिक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर सुरूवातीला चाळीसगाव (जि. अहमदनगर) येथे सेवा केल्यानंतर सद्या ते दापोली येथे उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी सन 2020-2021 या महसूल वर्षामध्ये आपली कर्तव्ये व जबाबदाऱ्या उत्कृष्टपणे पार पाडून केलेल्या उल्लेखनीय कामाबद्दल महसूल दिनानिमित्त त्यांना जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील व अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. याबद्दल श्री. पवार यांचे विविध क्षेत्रातील मान्यवर व ग्रामस्थांनी अभिनंदन केले.