सातारा | सकलेन मुलाणी
सद्रक्षणाय खलनिग्रहनाय हे ब्रीदवाक्य घेऊन काम करणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांना त्यांच्या कामातील तत्परतेमुळे नेहमीच नावाजलं जातं. प्रसंग बाका असेल तर डोळ्यांत तेल घालून हे लोक काम करत असतात. अशा परिस्थितीत अनावश्यक प्रसंगी त्यांच्यावर कामाचा बोजा वाढू नये म्हणून लक्ष देणं आवश्यक असल्याची गरज शरद पवार यांनी व्यक्त केली होती.
राजकीय कार्यक्रमात तत्पर सेवा बजावणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांना कार्यक्रम सुरु असताना बसण्यास खुर्ची मिळावी यासाठी शरद पवारांनी गृहमंत्र्यांना पत्र लिहून मागणी केली होती याचा प्रत्यय खुद्द त्यांच्याच कार्यक्रमात आला. रयतच्या सातारा विभागात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात पोलिसांना खास आदेश देऊन खुर्ची उपलब्ध करून देण्यात आली. साताऱ्यात झालेल्या या कार्यक्रमात पोलिस कर्मचारी आणि अधिका-यांनी खुर्चीवर बसूनच संरक्षणाची जबाबदारी बजावली. गृहमंत्र्यांना केलेल्या सुचनेची आदेश निघण्यापूर्वीच अंमलबजावणी झाली. आता बाकी कार्यक्रमातही पोलीस मंडळींना हा दिलासा मिळणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.