सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
शासनाच्या विविध योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘शासन आपल्या दारी’ अभियानाचा शुभारंभ १३ मे रोजी पाटण (जि. सातारा) येथे करण्यात आला. २७ हजार पात्र लाभार्थींना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यात यश मिळवत पाटणच्या अभियानाने राज्याचे लक्ष वेधून घेतले. सोमवारी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या अभियानाच्या राज्यस्तरीय आढावा बैठकीत पाटणच्या अभियानाचे यश अधोरेखित करण्यात आले. मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि मा. उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी या बैठकीत पाटणच्या यशस्वी अभियानाबद्दल पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेबांचे कौतुक करत पाटणचा हा पॅटर्न इतर जिल्ह्यांमध्ये हे अभियान राबवताना अमलात आणावा अशी सूचना केली.
राज्य शासनातर्फे सुरू करण्यात आलेल्या ‘शासन आपल्या दारी’ अभियानाचा शुभारंभ १३ मे रोजी मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या हस्ते पाटणमधील दौलतनगर-मरळी येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी मोफत आरोग्य शिबीर आणि पं. दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळाव्याचेही आयोजन करण्यात आले होते.
पाटणमध्ये ‘शासन आपल्या दारी’ अभियानाच्या माध्यमातून तब्बल २७ हजार पात्र लाभार्थींना शासनाच्या विविध योजनांचा लाभ उपलब्ध करून देण्यात आला. कार्यक्रमाच्या माध्यमातून सामाजिक न्याय, कृषी, महिला-बाल कल्याण, रोजगार यांसह १७ विभागांकडील योजनांचा लाभ पात्र लाभार्थींना देण्यात आला. महसूल व सामाजिक न्याय विभागाकडून देण्यात येणारे सुमारे १० हजार दाखले या अभियानात वितरित करण्यात आले. या अभियानाद्वारे तहसिल कार्यालय पाटणकडून १० हजारांहून अधिक लाभार्थींना लाभ दिला गेला.
तसेच पंचायत समिती पाटणकडून ९ हजार ३७१, वेल्फेअर बोर्ड साताराकडून १ हजार ५५१, तालुका कृषी अधिकारी पाटण यांच्याकडून १ हजार २९५ , तहसिल कार्यालय कराडकडून १ हजार २३२ यासह प्रांत कार्यालय पाटण, तालुका कृषी अधिकारी कराड, नगर पंचायत पाटण, महावितरण, वन विभाग, दुय्यम निबंधक, जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय, जिल्हा रुग्णालय कराड यांच्यामार्फत लाभार्थींना लाभ देण्यात आला. तसेच यावेळी आयोजित आरोग्य शिबिरात परिसरातील १ हजार नागरिकांनी सहभाग नोंदवला. या अभियानाचाच एक भाग म्हणून आयोजित करण्यात आलेल्या पं. दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळाव्यात सुमारे ५०० उमेदवारांनी भेट दिली. यात १५ जणांना त्याच दिवशी नोकरीचे नियुक्ती पत्र मिळाले, तर २५१ जणांची नोकरीसाठी प्राथमिक निवड झाली.
शासकीय अधिकारी हे जनतेचे सेवक आहेत. ‘शासन आपल्या दारी’ अभियानाच्या माध्यमातून वरिष्ठ अधिकारी शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी जनतेच्या दारात जात आहेत. नागरिकांना विविध योजनांचा लाभ देण्यासाठी व्यापक प्रयत्न करण्यात येत आहेत. पाटणमध्ये हे अभियान आम्ही यशस्वी करून दाखवले. त्याची राज्यस्तरावर दखल घेतली गेली, याचे समाधान आहे. मात्र एका दिवसापुरते मर्यादित न ठेवता, या अभियानाचा ‘सातारा पॅटर्न’ राबवून तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचवू. मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि मा. उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राज्यातील सर्वसामान्य जनतेसाठी नियोजनबद्ध पद्धतीने राबवून अधिकाधिक नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देऊ, अशी भावना महाराष्ट्राचे उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी यानिमित्ताने व्यक्त केली.