हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सातारा जिल्हा बँक निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांना अनपेक्षित पराभव पत्करावा लागला. या पराभवानंतर शशिकांत शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना भाजप नेते शिवेंद्रराजे भोसले तसेच जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर निशाणा साधला. माझ्या पराभवामागे मोठं कारस्थान आहे. शिवेंद्रराजे भोसले कोणत्या पक्षात आहेत हे पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी मला एकदा सांगावं, म्हणजे पुढच्या काळात कोणत्या तालुक्यात पक्ष कसा वाढवायचा हे ठरवता येईल,’ असा इशारा शिंदे यांनी दिला.
शशिकांत शिंदे म्हणाले, ज्ञानदेव रांजणे हे छोटे कार्यकर्ते आहेत. त्यांचा ‘बोलविता धनी’ वेगळा आहे. जिल्ह्यात मी राष्ट्रवादी पक्ष वाढवत असल्यानं अनेकांना माझा अडसर आहे हे मला माहीत आहे, असं म्हणत, त्यांनी आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यावर निशाणा साधला. ‘पक्षासाठी मी कुणालाही अंगावर घेतो हा माझा दोष आहे. जावलीची जनता कोणाच्या मागे आहेत हे कळेलच.
दरम्यान, मी पक्षाचा सच्चा कार्यकर्ता आहे हे शरद पवार साहेबांना माहीत आहे. एकनिष्ठ आहे, मी त्यांच्यासाठी जीव देईन. त्यामुळं कार्यकर्त्यांनी कुठलीही चुकीची भूमिका घेऊ नये. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पवार साहेबांमुळंच माझी राजकीय ओळख आहे. कालच्या निवडणुकीत स्वत: शरद पवार साहेबांनी आणि अजितदादांनी माझ्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र, काही गोष्टी वेगळ्या घडल्या. आम्ही गाफील राहिलो, त्याचा फटका बसला,’ असं शिंदे म्हणाले.