सातारा । राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांचा आज जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत पराभव झाला. राष्ट्रवादीच्याच जिल्ह्यातील नेत्यांनी शिंदे यांच्याविरुद्ध षडयंत्र केल्याची चर्चा सर्वत्र सुरु आहे. अशात माझा पराभव हा ठरवून केलेला कार्यक्रम आहे. शेवटच्या दिवसापर्यंत मला चर्चेत ठेवण्यात आलं अशी प्रतिक्रिया शिंदे यांनी दिली आहे.
मी पवारसाहेबांच्या निष्ठावंत कार्यकर्ता आहे. माझ्या कोणत्याही कार्यकर्त्यांकडून भावनेच्या भरात काही चुकीची घटना घडली असेल तर त्याबद्दल मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. माफी मागतो. पक्षामुळे माझी आजपर्यंतची राजकीय ओळख आहे. कालपर्यंत अजितदादा, पवारसाहेबांनी माझ्यासाठी प्रयत्न केले होते. त्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अशा प्रकारचे कृत्य करू नये अशी माझी विनंती आहे.
जिल्ह्याच्या पातळीवर सर्वांनी प्रयत्न केले. अजितदादांसोबत बैठक झाल्यानंतरच माझं नाव निश्चित झालं. माझं नाव निश्चित झाल्यानंतर पेनेलच्या प्रमुखांनी उमेदवारांना समजावण्याचा प्रयत्न करणं गरजेचं होतं. त्यांनी प्रयत्न केला मात्र तो कितपत यशस्वी झाला अन मनापासून प्रयत्न केला का हे येणारा काळ त्यांना सांगेल असे शिंदे म्हणाले आहेत.
माझा पराभव हे ठरवून केलेला कार्यक्रम आहे. ठरवून केलेलं षडयंत्र आहे. शेवटच्या दिवसापर्यंत मला चर्चेत ठेवण्यात आलं. जर हे लक्षात येताच मी वेगळ्या हालचाली केल्या असत्या तर पवार साहेबांनी भूमिका घेतलेली असताना माझ्या हालचालींनी चुकीचा मेसेज जाऊ नये म्हणून मी शांत राहिलो हि माझी चूक झाली असे शिंदे म्हणाले आहेत.
तसेच, मी फार सरळ माणूस आहे. राजकारणात खूप छक्के पंजे खेळावे लागतात हे मला दोन निवडणुकांनंतर कळलेले आहे. पराभव हा होत असतो. जनता कोणाच्या मागे आहे हा वेगळा विषय आहे. मात्र मी गाफील राहिलो हीच माझी चूक झाली असंही शिंदे बोलताना म्हणाले.